BJP Manifesto 2024: भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचा भाजपचा संकल्प; मोदींची गॅरंटी | पुढारी

BJP Manifesto 2024: भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचा भाजपचा संकल्प; मोदींची गॅरंटी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करतानाच “जीवायएएन” अर्थात “ग्यान” संकल्पनेखाली गरीब, युवक, अन्नदाता शेतकरी आणि नारी, या चार शक्तींच्या बळकटीसाठी काम करण्याचा निर्धार असलेला लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा भाजपने रविवारी घोषित केला. “मोदींची गॅरंटी आणि विकसित भारत -२०४७” संकल्पपत्र, असे नाव दिलेल्या या जाहीरनाम्यात केंद्रसरकारने गरिबांसाठी सुरू केलेली मोफत अन्नधान्य योजना पुढील पाच वर्षांसाठी देखील सुरू राहील, अशी “मोदी गॅरंटी” नमूद आहे. भाजपने सर्वच वर्गातील लोकांसाठी अशा २४ मोदी गॅरंटी दिलेल्या आहेत. (BJP Manifesto 2024)

BJP Manifesto 2024: गरीब, युवक, अन्नदाता शेतकरी आणि नारी, या चार शक्तींसाठी ” मोदींची गॅरंटी”

नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात रविवारी सकाळी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हे संकल्पपत्र प्रकाशित केले. विकसित भारताचे स्वप्न २०४७ पर्यंत पूर्ण करण्यासाठी गरीब युवक, अन्नदाता शेतकरी, आणि महिलांना आणखी सक्षम करण्याचा संकल्प यामध्ये करण्यात आला आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन सामाजिक न्यायाच्या लढाईसाठी समर्पित केले. डॉ. आबेंडकर यांनी दाखविलेल्या मार्गावरच जनसंघापासून भाजपपर्यंतचा राजकीय प्रवास सुरू आहे. सत्तेत राहून आणि सत्तेत नसतानाही आमची सामाजिक लढाई सुरूच आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या जयंतीदिनीच आम्ही हे संकल्पपत्र घोषित केले असल्याचे भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले. (BJP Manifesto 2024)

राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा जाहीरनामा तयार

मोदी सरकारने आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात राबविलेल्या योजनांचा लाभ घेणाऱ्या विविध क्षेत्रातील लोकांना व्यासपीठावर पाचारण करून त्यांना संकल्पपत्राची प्रत सोपविण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ जानेवारी रोजी भाजपचा जाहीरनामा तयार करण्यासाठी देशभरातून सूचना मागविल्या होत्या. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार, सुमारे १५ लाख सूचना प्राप्त झाल्या. नमो ॲपच्या माध्यमातून ४ लाख तर व्हिडिओच्या माध्यमातून ११ लाख लोकांनी आपल्या सूचना भाजपला पाठविल्या आहेत. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली २७ ज्येष्ठ नेत्यांची समिती बनविण्यात आली होती. या समितीने पक्षाचा जाहीरनामा तयार केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या समितीच्या संयोजक आहेत.(BJP Manifesto 2024)

PM मोदींकडून संकल्प पत्र जाहीरनाम्यात २४ गॅरंटी

भाजपचा संकल्पनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,  मुद्रा योजनेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात कोट्यवधी लोकांना उद्योजक बनविण्याचे काम केले जात आहे. मुद्रा योजनेच्या यशामुळे भाजपने आणखी एक संकल्प केला आहे. या योजनेतील कर्जाची मर्यादा १० लाखांवरून २० लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. गोरगरिबांना मोफत धान्य वाटप योजना पुढील पाच वर्षांपर्यंत सुरूच राहील, ही मोदींची गॅरंटी आहे, असे पंतप्रधानांनी आश्वस्त केले. “सबका साथ सबका विकास”  घोषणेनुसार, या संकल्पनाम्यात शेतकरी, युवा, महिला, मध्यमवर्ग ज्येष्ठ नागरिक, मच्छिमार, छोटे व्यापारी आदी सर्वच वर्गांसाठी २४ गॅरंटी देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

BJP Manifesto 2024:’या’ चारही शक्तीला आणखी संधी देणार- PM मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले की, औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे बांधले जातील. या वसतिगृहांमध्ये “शिशूगृह”  यासारख्या सुविधा राहणार आहेत. देशभरात “वंदे भारत” या खास रेल्वेगाडीचा विस्तार केला जाईल. वंदे भारत स्लीपर चेअर कार आणि मेट्रो अशा तीन मॉडेलमध्ये ही रेल्वे गाडी चालवली जाणार आहे. अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेनचे काम पूर्ण होत आले आहे. उत्तर भारतासह दक्षिण आणि पूर्व भारतातही बुलेट ट्रेन चालवली जाईल. केंद्र सरकारने आतापर्यंत ४ कोटी लोकांना हक्काची घरे दिली आहेत. राज्य सरकारांकडून गरिबांसाठी घरांची मागणी आल्यामुळे आणखी तीन कोटी घरे बांधण्याचा आमचा संकल्प आहे. आम्ही स्वस्त दरात घराघरांमध्ये गॅस सिलेंडर पोहचविले होते. आता पाईपलाईनद्वारे घराघरात स्वयंपाकाचा गॅस पोहचविण्याचा आमचा संकल्प आहे. देशाला भाजपच्या जाहीरनाम्याची प्रतीक्षा असते. गेल्या दहा वर्षात पक्षाने प्रत्येक वर्गाला गॅरंटी दिली आहे. युवा, महिला, गरीब आणि  शेतकरी वर्ग या चार शक्ती विकसित भारताचे मजबूत स्तंभ आहेत. या चारही शक्तीला आणखी संधी देऊन त्यांची गुणवत्ता वाढविण्यावर या संकल्पनाम्यात भर देण्यात आल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.

३ कोटी महिलांना लखपती बनवणार

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतकऱ्यांना कीटकनाशक प्रयोग, सिंचन, मातीची गुणवत्ता, हवामानाचा पूर्व अंदाज या कृषी संबंधित सर्व गोष्टींची माहिती मिळण्यासाठी स्वदेशी बनावटीचे कृषी सॅटॅलाइट लॉन्च केले जाणार आहे. केंद्रसरकारने ग्रामीण भागात “लखपती दीदी” योजना राबवून १ कोटी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. आणखी ३ कोटी महिलांना लखपती बनविण्याचा आमचा निर्धार आहे. आयुष्यमान आरोग्य योजनेत ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि तृतीयपंथीयांचाही समावेश केला जाणार आहे. ग्रामीण भागात दूरसंचार क्षेत्राच्या विकासातून २ लाखांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींना इंटरनेट ब्रॉडबँडने जोडले जाणार आहे. छोट्या व्यापाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने विमा योजना राबविली जाणार आहे. छोट्या व्यापाऱ्यांना आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती यासारख्या दुर्घटनांमधून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण दिले जाईल. शिक्षण आरोग्य, पायाभूत सुविधा, क्रीडा, तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक विकास आदी सर्व क्षेत्रातील गॅरंटी या संकल्पनाम्यात सामील करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

‘आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो’- राजनाथ सिंह

संरक्षण मंत्री आणि जाहीरनामा समिती अध्यक्ष राजनाथ सिंह म्हणाले, आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. हीच आमची सर्वात मोठी शक्ती आहे. भाजपने जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटविण्यासोबत संसदेत महिलांना  आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही दोन्ही आश्वासने पूर्ण केली आहेत. अयोध्येत नऊ एकरच्या परिसरात भव्य राम मंदिराची निर्मिती करण्यात आली असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

Back to top button