

नागपूर; राजेंद्र उट्टलवार : शिंदे गटातून कुणीही जाणार नाही. उद्धव ठाकरे गटाचेच आठ आमदार आमच्या संपर्कात आहेत. आजही नावे सांगू शकतो, लवकरच त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घालून देणार असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला. नाशिकच्या जागेवरून खासदार हेमंत गोडसे उद्धव ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत का? या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.
रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचार व आढावा बैठकीच्या निमित्ताने आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गद्दारीच्या आरोपासंदर्भात बोलताना, भाजपबरोबर जायचे हे आधीच स्पष्ट झालेले असताना काँग्रेस सोबत निवडणुकीनंतर जायचे ही विचारांची गद्दारी करणाऱ्यांनी आता आम्हाला शहाणपण शिकवू नये, असा टोला लगावला.
रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेचीच आहे, हे ठासून सांगताना यवतमाळ, वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरच लढेल आणि तो उद्या नामांकन दाखल करेल. अर्थात कुणाला उमेदवारी द्यायची हा मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे सांगत त्यांनी सस्पेंन्स कायम ठेवला.
गेल्या दोन दिवसात मुख्यमंत्री शिंदे यांची संजय राठोड यांनी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खासदार भावना गवळी यांनी भेट घेतल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सर्व ४८ जागा जिंकू म्हणत असताना राज्यात ४५ जागा आम्ही जिंकू, केवळ मोदींना विरोध म्हणून एकत्रित आलेल्यांची आघाडी तीन-चार जागा पलीकडे जाणार नाही असे सामंत म्हणाले.
या पत्रकार परिषदेला भाजपचे कुणीही पदाधिकारी उपस्थित नसल्याने सेना-भाजपातील विसंवाद उघड झाला. विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाखातर पक्षासाठी जो त्याग केला, त्यांना योग्य वेळी योग्य ती जबाबदारी दिली जाईल, पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही, असेही सामंत एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या नागपूर, रामटेकसह पूर्व विदर्भातील पाच तसेच दुसऱ्या टप्प्यातील पाच अशा सर्व दहाही जागा महायुती जिंकेल. आमच्यासमोर उभे असलेले उमेदवार निष्प्रभ असल्याचा दावा त्यांनी केला.
१० एप्रिल रोजी कन्हान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असे अनेक नेते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार असावा, ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना असून कालपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे. उद्या सकाळी माझ्या निवासस्थानी बैठक असून योग्य निर्णय होईल. कधीकाळी भावनिक प्रश्न पुढे येतात. मात्र तिन्ही पक्षाचे नेते समन्वयातून मार्ग काढतील. नारायण राणे यांनी मांडलेले विचार त्यांचे स्वतंत्र असू शकतात. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मात्र ही जागा शिवसेनेचीच आहे यावर सामंत यांनी भर दिला.
दरम्यान, रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द होणार असे माहीत असताना त्यांना जाणीवपूर्वक निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. पर्यायी एबी फॉर्म देखील तयार ठेवण्यात आला. हा एका महिलेचा अपमान असून काँग्रेसचा कुटील डाव यानिमित्ताने स्पष्ट झाला. उमेदवारी अर्ज रद्द झाल्याचे खापर विरोधकांवर फोडण्यात अर्थ नाही असे सामंत यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार कृपाल तुमाने, किरण पांडव, जयदीप कवाडे, बाबा गुजर, सतीश शिंदे आदी उपस्थित होते.
हेही वाचा :