शिवसेना स्वबळावर लढणार : मंत्री शंभूराज देसाई | पुढारी

शिवसेना स्वबळावर लढणार : मंत्री शंभूराज देसाई

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडी धर्म सोयीस्करपणे पाळला. त्यामुळे शिवसेना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावरच लढणार असल्याची घोषणा गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. दरम्यान, कोरेगावात आघाडी धर्म पाळणार नाही. फिरस्त्यांना आम्ही सोबत घेणार नाही, असे आ. महेश शिंदे यांनी स्पष्ट केले.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी धर्म पाळला जाणार का? असे विचारले असता ना. देसाई म्हणाले, जिल्हा बँकेत शिवसेनेने आघाडी धर्म पाळला परंतु राष्ट्रवादीने सोयीस्करपणे भूमिका घेतली. बँकेच्या निवडणुकीचा लेखा जोखा मुख्यमंत्र्यांना कळवला आहे. स्थानिक पातळीवर सोयीस्कर राजकारण होत असल्याने शिवसेना स्वबळावर लढणार आहे.

कोरेगावात आघाडी असणार का? असा प्रश्न आ. महेश शिंदे यांना विचारला असता ते म्हणाले, आघाडीचा कोरेगावात दुरान्वये संबध नाही. कोरेगाव व माण येथील संचालक शिवसेनेचे असून राष्ट्रवादीने नाकारले तरी सेनेने आपली ताकत दाखवली आहे. राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळला नाही तर आम्हालासुद्धा सगळे पर्याय खुले आहेत. बँकेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही शिवसेना पूर्ण ताकतीने स्वबळावर लढणार आहे.

एस. टी. कर्मचार्‍यांची केलेली पगारवाढ तुटपुंजी असून संप कधी संपणार? असे विचारले असता ना. देसाई म्हणाले, 1 लाख कोटींचे नुकसान राज्याला कोरोना काळात झाले आहे. एस. टी कर्मचार्‍यांना घसघशीत 41 टक्के पगारवाढ केली आहे. त्यामुळे सरकारला 800 ते 900 कोटींचा फटका बसणार आहे. कुणी सांगतय व कुणीही वावड्या उठवतयं म्हणून आंदोलन करणे चुकीचे आहे. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार व परिवहन मंत्री ना. अनिल परब यांनी याबाबत सरकारची भूमिका जाहीर केली आहे.

कोविडच्या नव्या व्हेरिएंटला रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या? असे विचारले असता ना. देसाई म्हणाले, विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी व विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टास्क फोर्स यावर नजर ठेवून आहे. उपाययोजना संदर्भाने जिल्ह्याची तातडीची बैठक घेतली जाणार आहे.

फिरस्त्यांना वाटतं गाव आमचं : आ. शिंदे

शिंदे-शिंदे भावकीच्या संदर्भात छेडले असता आ. महेश शिंदे म्हणाले, ‘कुठं आमच्याशी त्यांची भावकी जोडताय’, ते जावलीचे आम्ही खटावचे त्यांचा आमचा काही संबंध नाही. गावात एखादा फिरस्ता येऊन राहतो मग अनेक वर्ष उलटल्यावर ते गाव मग त्यांचचं आहे अस काहीजणांना वाटायला लागत. कोरेगावात काहींच असचं झालयं अशी कोपरखळी आ. महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांना मारली.

हेही वाचलत का?

Back to top button