

कानपूर : पुढारी ऑनलाईन
आर अश्विन (R. Ashwin) टीम इंडियासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने हरभजन सिंगचा (417) विक्रम मोडला आहे. भारताकडून अनिल कुंबळे यांच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत. त्यांनी भारतासाठी 132 कसोटीत 619 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर भारताचे माजी कर्णधार आणि अनुभवी वेगवान गोलंदाज कपिल देव हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी भारतासाठी 131 कसोटी सामन्यांमध्ये 434 बळी घेतले आहेत.
कानपूर कसोटीच्या पाचव्या दिवशी न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथम शानदार फलंदाजी करतहोता. त्याने दुस-या डावातही अर्धशतकी खेळी केली. पण अर्धशतक पूर्ण करताच तो अश्विनच्या एका शानदार चेंडूवर बाद झाला. अश्विनने भारताला तिसरे यश मिळवून दिले.
ऑफस्पिनर हरभजन सिंगने 103 कसोटी सामन्यात 417 विकेट घेतल्या. तर आर अश्विनने 80 व्या कसोटी सामन्यातच ही कामगिरी केली आहे. याच सामन्यात आर अश्विनने क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये 414 बळी घेणारा पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमला मागे टाकले होते. आर अश्विनने 30 वेळा एका डावात पाच विकेट्स आणि 7 वेळा सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत.
भारतीय संघाचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने ट्विट करून आर अश्विनचे अभिनंदन केले आहे. त्याने लिहिले- 'भाऊ असाच विकेट घेत राहा आणि चमकत राहा.'