टेंभुर्णी : माढा तालुक्यात ट्रक-टॅंकरचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू | पुढारी

टेंभुर्णी : माढा तालुक्यात ट्रक-टॅंकरचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू

टेंभुर्णी : पुढारी ऑनलाईन

पुणे सोलापूर महामार्गावरील भीमानगर येथील ग्यानी ढाब्यासमोर ट्रक व टँकर यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले. सहाजण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी रात्री साडे अकरा ते पावणे बारा वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातातील जखमींना टेंभुर्णी व इंदापूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या दोन्ही वाहनांची धडक झाल्यानंतर ट्रक महामार्गावर आडवा पडला. त्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. टेंभुर्णी, इंदापूर व महामार्ग सुरक्षा पथकातील अधिकारी व पोलिसांना दीड तासाच्या प्रयत्नानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू केली.

टँकर ड्रायव्हर संजय शंकर कवडे (श्रीपुर तालुका माळशिरस ), ट्रक ड्रायव्हर शिवाजी नामदेव पवार (वय-30 ), ट्रकमधील प्रवासी वेंकट रामण्णा दंडघुडे (वय-45 रा. सालेगाव ता. लोहारा जि. उस्मानाबाद ) किसन रामलू राठोड (वय-45 रा. इंदिरानगर कात्रज; पुणे ), शिवाय एकाची मृताची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. तर दत्ता अशोक घंटे (वय -29 रा. सालेगाव ता. लोहारा जि. उस्मानाबाद), व्यंकूसिंग रतन सिंग रजपूत (वय-66 रा. केसर जवळगा ता. उमरगा), गौरी दत्ता रजपूत वय- 33 रा. पुणे ) मीनल दत्ता रजपूत (वय- 4 ), धीरज दत्ता राजपूत (वय-12 ), सुलोचना गोटू सिंग रजपूत(रा. पुणे) अशी जखमींची नावे आहेत.

याविषयी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, पुणे सोलापूर महामार्गावरील भीमानगर येथील ग्यानी ढाब्यासमोर सोलापूरहून पुण्याकडे जाणारा ट्रक ( एम एच 25 / यु 4045)व पुण्याकडून सोलापूरकडे जाणारा टँकर (एम एच 14 / सीपी 4020) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये ट्रकमधील तीन जण व टँकरमधील एक जण असे एकूण चार जण जागीच ठार झाले. तर पाच जण गंभीर जखमी झाले. यातील एकाचा उपचार सुरू असताना रात्रीच मृत्यू झाला. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या अपघातातील दोन्ही वाहनांची धडक एवढी जबरदस्त होती की, अपघातातील दोन्ही वाहनांच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला असून अपघात होताच ट्रक महामार्गावर आडवा झाला.

या अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले, पोलिस उपनिरीक्षक पोपट काशीद, हवालदार अभिमान गुटाळ, बाळासाहेब चौधरी, केशव झोळ, शेख आदी सहकार्‍यांसह तातडीने घटनास्थळी आले.

इंदापूर येथील पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व पोलिस तसेच महामार्ग सुरक्षा पथकातील पोलिस मदतीला आले. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे हे घटनास्थळी आले. या सर्वांनी अपघातील जखमी व मयतांना अपघातग्रस्त वाहनातून बाजूला करून टेंभुर्णी व इंदापूर येथे उपचारासाठी हलविले. तसेच अपघातानंतर महामार्गावर असणारा ट्रक सुमारे दिड तासांच्या प्रयत्नानंतर बाजूला करून पोलीसांनी वाहतूक सुरळीत केली. अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांनी घटनास्थळास भेट दिली.

दिशादर्शक फलक नसल्याने दोन ठेकेदारांवर गुन्हा

महार्गावर भीमानगर ता. माढा येथे रस्त्याचे काम सुरू आहे. याबाबत ठेकेदाराने वळण रस्त्यापूर्वी कोणत्याही प्रकारचा दिशादर्शक फलक लावला नाही. त्यामुळे या भीषण अपघातास जबाबदार धरून रोड मेंन्टेन्सचे ठेकेदार कृष्णदेव कांतीलाल केदार (वय 35, रा. कन्हेरगाव ता. माढा) व अन्य एक ठेकेदार तसेच मृत ट्रकचालक शिवाजी नामदेव पवार व मृत टँकर चालक संजय शंकर कवडे यांच्यावरही इतरांच्या मृत्यूसही कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलत का

Back to top button