ind vs nz test 4th day : न्यूझीलंडला पहिला झटका, विल यंग बाद | पुढारी

ind vs nz test 4th day : न्यूझीलंडला पहिला झटका, विल यंग बाद

कानपूर; पुढारी ऑनलाईन : ind vs nz test 4th day :  कानपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील खेळ सुरूच आहे. जिथे टीम इंडियाने आपला दुसरा डाव ७ गडी गमावून २३४ धावांवर घोषित केला. भारतीय संघाकडे एकूण २८३ धावांची आघाडी असून न्यूझीलंडला पहिली कसोटी जिंकण्यासाठी २८४ धावांची गरज आहे. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंडचे सलामीवीर मैदानात उतरले. त्यानंतर तिस-या षटकातच किवी संघाला पहिला धक्का बसला. फिरकी गोलंदाज आर अश्विनने विल यंगला पायचित पकडले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा पहुण्यासंघाची धावसंख्या १ बाद ४ आहे. विजयासाठी त्यांना अजून २८० धावांची गरज आहे.

दरम्यान, कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात भारताने आपल्या दुस-या डावात दमदार पुनरागमन केले. सुरुवातीच्या पाच विकेट्स लवकर गमावल्यानंतर श्रेयस अय्यरने अश्विन आणि त्यानंतर रिद्धिमान साहासोबत सलग दोन अर्धशतकी भागीदारी केली. श्रेयसनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताच्या दुसऱ्या डावात श्रेयसने ६५ आणि ऋद्धिमान साहाने ६१ धावा केल्या. साहा आणि अक्षर पटेल यांनी आठव्या विकेटसाठी १२४ चेंडूत नाबाद ६७ धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने ६७ चेंडूत नाबाद २८ धावा केल्या. अश्विननेही ३२ धावांचे मूल्यवान योगदान दिले. दुसरीकडे, किवींसाठी काईल जेमीसन आणि टिम साउदीने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.

ऋद्धिमान साहाने आपले कौशल्य दाखवले…

ऋद्धिमान साहाने खडतर परिस्थितीत चमकदार फलंदाजी केली आहे. मान दुखावल्याने तो काल तिस-या दिवशी यष्टीरक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. पण आज त्याने फलंदाजी करत ११५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे सहावे तर न्यूझीलंडविरुद्धचे तिसरे अर्धशतक आहे. त्यासह ऋद्धिमान आणि अक्षर पटेल या जोडीने चिवट फलंदाजी करत ५० धावांचीही भागिदारी पूर्ण केली.

श्रेयस अय्यरची शानदार खेळी संपुष्टात…

टीम साऊदीने पुन्हा एकदा भारताला मोठा धक्का दिला. त्याने श्रेयस अय्यरला ब्लंडेलकरवी झेलबाद केले. श्रेयसने १२५ चेंडूत ६५ धावा केल्या. त्याने आठ चौकार आणि एक षटकार लगावला. पहिल्या डावात श्रेयसने १०५ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावातही त्याने आपला अप्रतिम फॉर्म कायम ठेवला. त्याने १०९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. प्रदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात ५०+ धावा करणारा अय्यर भारताचा ९ वा खेळाडू ठरला. तर पदार्पणाच्या कसोटीत १५०+ पेक्षा जास्त धावा करणारा अय्यर हा चौथा भारतीय खेळाडू ठरला.
२०१० नंतर कसोटी पदार्पणात शतक आणि अर्धशतक झळकावणारा अय्यर हा दुसरा खेळाडू ठरला. पहिला आहे तो फाफ डु प्लेसिस. त्याने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात अर्धशतक(७८) आणि दुस-या डावात शतक (११०) झळकावले होते.

दरम्यान, विल सोमरव्हिलने ४९ व्या षटकात गोलंदाजी करताना ऋद्धिमान साहाने भारताच्या दुसऱ्या डावातील पहिला षटकार ठोकला. पहिल्याच चेंडूवर साहा झेलबाद होण्यापासून वाचला होता आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून सीमापार गेला. साहा आणि अय्यर यांनी ७ व्या विकेटसाठी १२६ चेंडूत ६४ धावांची भागीदारी केली.

डेब्यू टेस्टमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

 • १८७ शिखर धवन विरुद्ध ऑस्ट्रेलिया (मोहाली २०१२/१३)
 • १७७ रोहित शर्मा विरुद्ध वेस्ट इंडिज (कोलकाता २०१३/१४)
 • १७० श्रेयस अय्यर विरुद्ध न्यूझीलंड (कानपूर २०२१/२२)
 • १५६ लाला अमरनाथ विरुद्ध इंग्लंड (मुंबई जिम १९३३/३४)

दरम्यान, विल सोमरव्हिलने ४९ व्या षटकात गोलंदाजी करताना ऋद्धिमान साहाने भारताच्या दुसऱ्या डावातील पहिला षटकार ठोकला. पहिल्याच चेंडूवर साहा झेलबाद होण्यापासून वाचला होता आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून सीमापार गेला. साहा आणि अय्यर यांनी ७ व्या विकेटसाठी १२६ चेंडूत ६४ धावांची भागीदारी केली.

श्रेयस अय्यरचे अर्धशतक

पहिल्या डावात १०५ धावा करणाऱ्या श्रेयस अय्यरने दुसऱ्या डावातही आपला अप्रतिम फॉर्म कायम ठेवला आहे. त्याने १०९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अर्धतकीय खेळीत त्याने १ षटकार आणि ५ चौकार लगवले. दरम्यान, याच बरोबर भारतीय संघाची आघाडी २०० पार गेली आहे.

टेस्ट डेब्यूच्या दोन्ही डावांत 50+ धावा करणारे भारतीय खेळाडू

 • दिलवार हुसेन ५९ आणि ५७ विरुद्ध इंग्लंड (कोलकता 1933/34)
 • सुनिल गावस्कर ६५ आणि ६७* विरुद्ध वेस्ट इंडिज (पोर्ट ऑफ स्पेन 1970/71)
 • श्रेयस अय्यर १०५ आणि ५०* विरुद्ध न्यूझीलंड (कानपूर 2021/22)

Image

भारताला सहवा धक्का….

आर अश्विनने श्रेयस अय्यरच्या साथीने सहाव्या विकेटसाठी भारतीय डाव सांभाळला. दोघांनी ११८ चेंडूत ५२ धावांची भागिदारी केली. पण ही भागीदारी काईल जेमिसनने मोडली. त्याने ३९.२ व्या षटकात भारताची अश्विनला क्लिन बोल्ड केले. अश्विनने पाच चौकारांसह ६२ चेंडूत ३२ धावा केल्या. जेमिसनची ही तिसरी विकेट आहे.

Image

उपाहारानंतरच्या खेळास सुरुवात…

चौथ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर खेळ सुरू झाला आहे. रविचंद्रन अश्विन, श्रेयस अय्यर क्रीजवर आहेत. या जोडीने संयमी खेळीचे प्रदर्शन करत सहाव्या विकेटसाठी ५० धावांची भागिदारी पूर्ण केली आहे. आता टीम इंडियाची नजर मोठी आघाडी घेण्यावर आहे. जेणेकरून पाहुण्या किवी संघाला मोठे टार्गेट देवून त्यांचा ऑलआऊट करण्यास सोपे जाईल.

Image

उपाहारापर्यंत भारताची आघाडी १३३, अय्यर-अश्विनची संयमी खेळी

चौथ्या दिवसाचा पहिल्या सत्राचा खेळ संपला. भारताने दिवसाची सुरुवात एक बाद १४ धावांपासून केली. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी एकामागोमाग एक लोटांगण घातले. त्यामुळे भारताने ५१ धावांत ५ विकेट गमावल्या. यानंतर रविचंद्रन अश्विन आणि पदार्पणवीर श्रेयस अय्यर यांनी किवी गोलंदाजांवर प्रतिहल्ला करताना उपहारापर्यंत ३३ धावांचीभागिदारी केली होती. तर भारताची आघाडी १३३ धावांची होती. टीम साऊदी आणि काईल जेमिसन यांना २-२, तर एजाज पटेलला १ विकेट घेण्यात यश आले आहे.

टिम साउदीचे दोन झटके..

टीम साऊदीने डावाच्या २० षटकांत अप्रतिम गोलंदाजी केली. दुसऱ्या चेंडूवर मयंक अग्रवाल (१७) आणि चौथ्या चेंडूवर रवींद्र जडेजा (०) यांना बाद करून भारतीय संघाचे कंबरडे मोडले. मयंकच्या विकेटसोबतच साऊदीने भारताविरुद्धच्या कसोटी करीअरमध्ये ५० विकेट्स पूर्ण केल्या. मयंक लॅथमकडे झेल देऊन माघारी परतला, तर जडेजा पायचित बाद झाला. मयंकने तीन चौकारांच्या मदतीने ५३ चेंडूत १७ धावा केल्या. तर जडेजा अवघे दोन चेंडू खेळून शुन्यावर बाद झाला.

 • जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये ५ व्यांदा शून्यावर बाद झाला.
 • रिचर्ड हॅडली (६५) नंतर भारताविरुद्ध ५० कसोटी बळी घेणारा साऊदी हा दुसरा किवी गोलंदाज ठरला.

Image

अजिंक्य रहाणे बाद…

१५ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर एजाज पटेलने भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेला (4) बाद करून न्यूझीलंडला तिसरे यश मिळवून दिले. रहाणे एलबीडब्ल्यू आऊट झाला. मात्र, पंचांनी बाद केल्यानंतर भारतीय कर्णधाराने मयंक अग्रवालशी डीआरएसबाबत चर्चा केली, पण रिव्ह्यू घेतला नाही आणि पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. रहाणे १५ चेंडूत केवळ ४ धावा करून माघारी परतला.

 • अजिंक्य रहाणेची यंदाच्या वर्षाची सरासरी फक्त १९.५७ आहे.
 • अजिंक्य रहाणे २०२१ मध्ये ८ व्यांदा सिंगल डिजिटमध्ये बाद झाला.
 • रहाणेने गेल्या २२ डावांत कसोटी शतक झळकावलेले नाही.

Image

भारताला दुसरा झटका, पुजारा बाद…

चौथ्या दिवशी टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. दिवसाच्या पहिल्या अर्ध्या तासात चेतेश्वर पुजाराने जेमिसनच्या चेंडूवर यष्टिरक्षक ब्लंडेलकडे त्याचा झेल दिला. जेमिसनची ही दुसरी विकेट आहे. त्याने १२ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पुजाराला बाद केले. पुजाराने ३ चौकारांच्या सहाय्याने ३३ चेंडूत २२ धावा केल्या.

Image

शुबमन गिल पुन्हा बोल्ड…

दुसऱ्या डावात टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. काइल जेमिसनने दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शुभमन गिलला (१) क्लीन बोल्ड केले. पहिल्या डावातही जेमिसनने गिलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. गिलच्या विकेटसह, जेमिसनने कसोटी क्रिकेटमधील ५० बळी पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा ३७ वा खेळाडू ठरला.

काल सामन्याच्या तिस-या दिवशी टीम इंडियाने शानदार पुनरागमन केले आहे. अक्षर पटेलच्या (६२/५) फिरकी गोलंदाजीमुळे भारताने न्यूझीलंडचा पहिला डाव २९६ धावांत गुंडाळला. मात्र, दुसऱ्या डावात टीम इंडियाला सुरुवातीचा झटका बसला. शुभमन गिल अवघी एक धाव करून बाद झाला. तिस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने एक विकेट गमावून १४ धावा केल्या. भारताची एकूण आघाडी ६३ धावांची आहे. आता चौथ्या दिवशी भारतीय संघाचे फलंदाज धावांचा डोंगर रचण्यात यशस्वी होतात का त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी भारतीय संघाला ३४५ धावांत गुंडाळत नेत्रदीपक कामगिरी केली. त्यांनी टीम इंडियाला बॅकफूटवर आणले. मात्र तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी डावपेच बदलून सामन्यात पुनरागमन केले. तिसऱ्या दिवशी अक्षर पटेलने कसोटी क्रिकेटमध्ये ५ व्यांदा डावात ५ बळी घेत भारतीय संघाला ४९ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. माध्यमांशी बोलताना अक्षर पटेल म्हणाला की, दुसऱ्या दिवशी यश न मिळाल्याने भारतीय गोलंदाजांनी आपली रणनीती बदलली. पत्रपरिषदेत अक्षर म्हणाला की, दुसऱ्या दिवशी एकही विकेट न मिळाल्याने आम्ही सर्वजण थोडे निराश झालो होतो. त्यामुळे तिस-या दिवशीच्या खेळात आम्ही आमची रणनीती बदलली. प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या सल्ल्यानुसार आम्ही तिसऱ्या दिवशी संयम राखला आणि त्यामुळेच आम्ही सामन्यात कमबॅक करू शकलो.’

 

Back to top button