वीज बिल भरणार नाही, कनेक्शन तोडाल तर…राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा | पुढारी

वीज बिल भरणार नाही, कनेक्शन तोडाल तर...राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

अहमदनगर, पुढारी ऑनलाईन: महावितरण शेतकऱ्यांना सदोष वीजबिल पाठवत आहे. एकीकडे वीजबिल माफ करतो म्हणून सांगायचे आणि दुसरीकडे भरमसाठ बिले पाठवायची, असा प्रकार सुरू असल्याने शेतकरी वीज बिले भरत नाहीत, असे वक्तव्य माजी खासदार राजू शेट्टी यांनी जामखेड येथे केले.

यावेळी शेट्टी यांनी महाविकास आघाडीवर टीका करत वीज बिलाचा मुद्दा ऐरणीवर आणला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची कनेक्शन तोडली तर शेतकरी गप्प बसणार नाही, असा इशारा दिला.

राजू शेट्टी अहमदनगर दौऱ्यावर आले असता जामखेड तालुक्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नगर जिल्ह्यात सध्या ज्या शेतकऱ्यांनी बिले भरली नाहीत त्यांची कनेक्शन महावितरण तोडत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला इशारा दिला आहे.

शेट्टी म्हणाले, ‘ महावितरणतर्फे सध्या शेतकऱ्यांना जी बिले पाठविली आहेत, ती चुकीची आहेत. चुकीची तांत्रिक पद्धत लावून बिले आकारली जात आहेत. बिले भरणाऱ्यांना पुढील वर्षी ५० टक्के माफी करू असे सांगितले जात आहे. जर बिलेच चूक असतील तर ती भरायची कशी? आणि बिले भरली नाहीत म्हणून कनेक्शन तोडायचे हा कुठला प्रकार आहे. जर कनेक्शन तोडली तर पिके वाळतील.

मात्र, महावितरण मनमानी करणार असेल तर शेतकरीही स्वस्थ बसणार नाहीत. त्यामुळे जेवढी वीज वापरली तेवढी बिले द्यावीत. ज्या शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले आहे ते पूर्ववत करावे, अन्यथा शेतकरी गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले.

बोगस नोंदी

महावितरणने कोरोना काळात बिले थांबवली होती. महावितरणने बिले देणे थांबवले होते. या काळात सरासरी बिले काढून पाठवली होती. ऊर्जामंत्र्यांनी कितीही आश्वासने दिली, तरी पाळली जात नाहीत. साडेसात हॉर्सपॉवरप्रमाणे १० हॉर्सपॉवर पंपाला बिल पाठविले आहे. हा सगळा आंधळा कारभार आहे. मुळात या बिलांच्या नोंदीच बोगस आहेत. त्या जागेवर जाऊन घेतल्या नाहीत. ही बिले कुठल्याही परिस्थितीत भरली जाणार नाहीत, असे शेट्टी म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button