

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : आमची खरी लढाई ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना सगे-सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण हवे आहे, असे स्पष्ट करत मराठा आरक्षणप्रश्नी२० फेब्रुवारीपर्यंत सगे-सोयरे बाबतचा निर्णय घेतला नाही किंवा राज्य सरकारनं भूमिका आज किंवा उद्या स्पष्ट केली नाही तर २० तारखेला विशेष अधिवेशन संपताच पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यात येईल, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि.18 ) पत्रकार परिषदेत दिली. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे त्यासाठीच हे आंदोलन आहे. २० तारखेला या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. ही अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. आंदोलन कोणतं, कसं याबाबतची पूर्ण भूमिका पत्रकार परीषदेतून स्पष्ट करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. (Maratha Reservation)
२० तारखेला सरकारने आरक्षण दिले तरी ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आमचे आंदोलन सुरूच राहणार. सरकार देत असलेले आरक्षण हा आव्हानाचा विषय आहे. ५० टक्क्यांच्यावर ते आरक्षण जात असल्याने तो आव्हानाचा विषय होणारा आहे. दिलेले आरक्षण टिकले नाही तर, पुन्हा कोर्टात जाण्याची वेळ आणि रडगाणे करण्याची वेळ येईल. हे आरक्षण घेऊन पुन्हा नियुक्तीच्यावेळी रडगाणे होणार त्यामुळे नोंदी नुसार आणि सगे सोयरे अंमलबजावणी महत्वाची आहे. ती कायमस्वरुपी टिकणारी आहे. आम्ही आमच्यावर विश्वास ठेवतो. कोर्टात जाणं हा पुढील विषय आहे, असेही जरांगे म्हणाले.
गरीब-श्रीमंत दरी कायम आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगे-सोयरे कायदा करून त्याची अंमलबजावणी करा ,ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना ओबीसीतून आरक्षण द्या. मूळ सगे सोयरे अध्यादेशात मातृसत्ताक नाही. तुम्ही हरकती मागितल्या आहेत,अधिसूचना काढली याचा अर्थ सरकारला ते आरक्षण द्यायचे होते, असा होतो. एकनाथ शिंदे साहेब त्याची अंमलबजावणी करतील, असेही ते म्हणाले.
सग्या सोयऱ्यांचं तेवढं करा, त्यावर देखील ध्यान ठेवा. हे बिल देखील तुमच्याच मराठ्यांचे आहे. मराठयांना आनंद होईल असा सल्ला अजित पवार यांना दिला. करा मग गुन्हे दाखल. तायवाडे यांनाही काही कळेना का आता. दुसऱ्याचं भांडण मोघम विकत घेऊ नका. आमच्यावर गुन्हे दाखल करणार का. करा मग गुन्हे दाखल, असं म्हणतं त्यांनी तायवाडेना आव्हान केले. बच्चू कडू का येत नाहीत यावर ते म्हणाले मी कस सांगू ते येत नाही म्हणून. जो येईल त्याचं स्वागतच केलं जाईल. त्यांच्यावर विश्वास आहे. आमच्याकडे कोणी कधीही येऊ शकतात, असे ते म्हणाले.
वैचारिक मतभेद हा वेगळा भाग आहे. सरकारला भांडल्याशिवाय लोकांना काही मिळत नाही. टोकाला जायचे ठरले तर आमच्याकडे देखील पुरावे आहेत. त्यांचे दोन मंत्री समोर असताना सगे-सोयरेबाबत विषय झाला आहे. सग्या-सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार आहे. जर तुम्ही हे केले तर मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील अन्यथा तुम्हाला रोष घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
हेही वाचा