अंतरवालीत जरांगेंचे उपोषण सुरू; मात्र बाहेरून येणाऱ्यांसाठी गावकऱ्यांकडून अन्न सेवा | पुढारी

अंतरवालीत जरांगेंचे उपोषण सुरू; मात्र बाहेरून येणाऱ्यांसाठी गावकऱ्यांकडून अन्न सेवा

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. हे आरक्षण आंदोलन कव्हर करण्यासाठी आलेले पत्रकार, कॅमेरामन आणि दूर-दूर वरून भेट देण्यासाठी येणारे समाज बांधव यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून माधूगिरी अन्न सेवा गेल्या पाच महिन्यांपासून अविरत सुरूच आहे. या ठिकाणी आमरण उपोषणाच्या पहिल्या टप्प्यापासून ते आजपर्यंत अविरत अन्नछत्रसेवा गावकऱ्यांच्या वतीने सुरू आहे.

मनोज जरांगे पाटील हे उपोषण करतात, परंतु इतर सर्वांना उपाशी पोटी कसे ठेवावे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून गावकऱ्यांच्या वतीने माधुगिरी मागुन म्हणजेच घराघरातून पोळी-भाजी, भाकरी, चटणी, ठेचा असे गावातील घरा-घरातून स्वयंपाकासाठी जे असेल ते जमा करून समाज मंदिराच्या ठिकाणी जमा केले जाते.

आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने गावात आलेले सर्वजण जिथे जागा मिळेल तिथे पंक्तीत बसून तर कुणी उभे राहून या अन्नदानाचा लाभ घेतात. आलेला प्रत्येक जण दोन घास जेवून जावा. कुणीही उपाशी राहू नये या भावनेतून गावकऱ्यांच्या वतीने ही माधवगिरी सेवा गेल्या पाच महिन्यांपासून सुरू आहे. जो येईल तो जेवण करून जाईल याची काळजी अंतरवाली ग्रामस्थांच्या वतीने घेतली जात आहे.
या गावात मिळणारे प्रेम, सहकार्य आणि अविरत सकाळ संध्याकाळी होत असलेले अन्नदान पाहून येणारा प्रत्येक समाज बांधव अंतरवालीच्या आदरा तिथ्याने भारावून जात आहे. आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत आमरण उपोषण जरी करीत असले तरी इतरांना त्रास होऊ नये इतरांची जेवणाची व्यवस्था व्हावी अशी भावना या सर्व गावकऱ्यांची आहे. या गावचा एकोपा सामाजिक बांधिलकी समाजाविषयी असलेला जिव्हाळा यातून दिसून येत आहे.

ग्रामस्थांचा अलिखित नियम

प्रत्येकाने आपल्या घरात आपल्या व्यतिरिक्त दोन-चार जणांचा शिल्लकचा स्वयंपाक करावा असा अलिखित नियम या गावकऱ्यांच्या वतीने गेल्या पाच महिन्यांपासून आजतागायत पाळला जातो आहे.

अंतरवाली सराटीचे गावकरी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची काळजी घेत असतानाच गावात येणाऱ्या प्रत्येक समाज बांधवांची, पत्रकार बांधवांची काळजी घेणे हे आपले कर्तव्यच आहेत ते आमचे पाहुणेच आहेत. अशा भावनेतून ही अन्न सेवा चालवत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button