सिन्नर : नायलॉन मांजाने एका व्यक्तीचा गळा कापला; प्रकृती चिंताजनक | पुढारी

सिन्नर : नायलॉन मांजाने एका व्यक्तीचा गळा कापला; प्रकृती चिंताजनक

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला सिन्नर येथे नायलॉन मांजामुळे एका व्यक्तीचा गळा चिरल्याची घटना घडली. उत्तम विष्णू आव्हाड (वय 55, रा. वडझिरे, ता. सिन्नर) असे गंभीर जखमी झालेल्‍या व्यक्तीचे नाव आहे.

रविवारी (दि. 14) सायंकाळच्या सुमारास उत्तम आव्हाड हे संगमनेर नाक्याकडून वडझिरे येथे जाण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याला अडकला. काही कळण्याच्या आत गळा चिरल्याने आव्हाड खाली पडले. आसपासच्या नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मातोश्री हॉस्पिटलचे डॉ. गणेश सांगळे यांनी तातडीने उपचार सुरू केले. तथापी जखम खोलवर व नसा कापल्या गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. रक्तस्राव बंद करून प्राथमिक उपचारानंतर जखमीला नाशिक येथे हलविण्यात आले आहे. जखमी व्यक्‍तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, न्यू सिन्नर ॲम्बुलन्सच्या शकील शेख यांनी तातडीने सिन्नर ते नाशिक रोड वीस ते पंचवीस किमी अंतर अवघ्या पंधरा मिनिटात कापून गंभीर जखमी आव्हाड यांना उपचारांसाठी दाखल केले. त्यामुळे नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असल्याचा आरोप…

मकर संक्रांतीला पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून मांजा वापर व विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असे आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश आहेत. असे असताना देखील चोरून विक्री होत आहे. त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

दुचाकीस्वारांनी काळजी घेण्याचे आवाहन…

मकरसंक्रांतीनिमित्त शहरात होणारी पतंगबाजी आणि नायलॉन मांजाचा वापर यामुळे होणारे अपघात होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी व मफलर तसेच हेल्मेट वापरावे व दुचाकी हळू चालवावी असे आवाहन सेवाभावी संस्थांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

Back to top button