Maharashtra politics : दक्षिण मुंबईवर भाजप पुन्हा पाणी सोडणार? | पुढारी

Maharashtra politics : दक्षिण मुंबईवर भाजप पुन्हा पाणी सोडणार?

मुंबई : गौरीशंकर घाळे

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशाने महाविकास आघाडीतला दक्षिण मुंबईचा तिढा सुटला असला तरी भाजपच्या महायुतीत दक्षिण मुंबई कुणाची आणि उमेदवार कोण या प्रश्नाने नवे घर केले आहे, आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत दक्षिण मुंबईची जागा जिंकायचीच, या उद्देशाने वर्षभरापासून भाजपची तयारी सुरू आहे. त्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढांकडे मतदारसंघाची विशेष जबाबदारीही दिली गेली, उमेदवार कोणीही असला तरी त्याला निवडून आणण्याची कामगिरी लोढांकडे आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पक्षनेतृत्वाने दक्षिण मुंबईतूनच लोकसभेची तयारी करण्याचे सांगितले होते असे समजते.
पक्षाने नार्वेकरांचे नाव नक्की केल्यास त्यांच्यासाठी लोढांना काम करावे लागणार हे क्रमप्राप्त होते. मात्र, स्वतः नार्वेकर याबाबत मौन बाळगून आहेत. उलट, ‘लोढाच दिल्लीला जातील’ अशी साखर पेरणी ते करत आले आहेत. त्यामुळे लोढा आणि नार्वेकरांचे नक्की काय सुरू आहे, असा प्रश्न मुंबई भाजपमध्ये आहे.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आणि मंत्री लोढा है दोघेही एकेकाळी खासदारकीसाठी उत्सुक होते. लोढा यांनी तर २०१४ साली आधी दक्षिण मुंबईसाठी वर्षभर तयारीही केली होती. मात्र, युतीच्या जागावाटपात उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईसाठी हट्ट केल्याने ही जागा शिवसेनेकडे गेली. आता शिवसेना फुटल्याने दक्षिण मुंबई परत भाजपला मिळविता येईल, अशी भाजप नेत्यांना आशा होती.

भाजप नेत्यांची सुटका!

दक्षिण मुंबईसाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री लोढा यांच्या नावांची चर्चा भाजपमध्ये आतापर्यंत होती. नार्वेकर हे लोढांचे नाव पुढे करत आहेत, तर लोढांना पक्षनेतृत्वाने उमेदवार निवडून आणायला सांगितलेले. अशात देवरा यांच्या निमित्ताने दक्षिण मुंबईच्या जागेवर शिंदे गटाला उमेदवार मिळाल्याने खासदारकीसाठी फारसे उत्साही नसलेल्या या भाजप नेत्यांची सुटका झाली का, अशी कुजबुजही मुंबई भाजपमध्ये आहे.

आता मिलिंद देवरांच्या सेना प्रवेशानंतर ही सर्व समीकरणे बदलली आहेत. दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळण्याच्या अटीवर देवरा शिंदे सेनेत गेले असतील तर शिंदे गट सहजासहजी दक्षिण मुंबई सोडणार नसल्याचे चित्र आहे. भाजपने ही जागा देवरांसाठी शिंदे सेनेला सोडल्यास ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना अशी तुंबळ दक्षिण मुंबईत पाहायला मिळेल.

राज्यसभेची चर्चा?

मिलिंद देवरा यांच्या प्रवेशासाठी श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. खासदार म्हणून चांगले काम करायचे आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे हात बळकट करायचे असल्याचे विधान देवरा यांनी पक्षप्रवेशावेळी केले. पण, मुख्यमंत्र्यांनी याबाबत चकार शब्द काढला नाही, त्यामुळे देवरा आगामी लोकसभेच्या खासदारकीबाबत बोलले की राज्यसभेच्या, असा प्रश्न केला जात आहे.

Back to top button