नागपूर : धावत्या रेल्वेत सहा जणांकडून लूटमार | पुढारी

नागपूर : धावत्या रेल्वेत सहा जणांकडून लूटमार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पुणे-हटिया रेल्वेत तृतीयपंथीयांच्या वेशात आलेल्या 6 जणांनी प्रवाशांना लुटल्याचा प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. त्यांच्याकडून 10 जणांना मारहाणही करण्यात आली. ही घटना नागपूरमध्ये गुरुवारी पहाटे घडली. एका महिलेने त्यांना पैसे नसल्याचे सांगितल्यावर तिचे 1 वर्षाचे बाळ हिसकावण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याचे प्रवाशांनी पत्रकारांना सांगितले.

पुणे-हटिया रेल्वे बुधवारी सकाळी अकरा वाजता पुण्यावरून निघाली. मध्यरात्री बाराच्या सुमारास वर्धा स्टेशनवर गाडी आल्यावर जनरल कोचमध्ये 6 लुटारू चढले. त्यांनी टाळ्या वाजवत प्रवाशांकडे पैसे मागायला सुरुवात केली. प्रत्येकाने किमान 500 रुपये द्यावेत, असा हट्ट धरला. पैसे न देणार्‍यांना बेदम मारहाण करत होते. त्यांनी 10 प्रवाशांना मारहाण केली. मध्यरात्री दीडच्या सुमारास आजनी-नागपूर दरम्यान रेल्वेचा वेग कमी झाल्यावर उतरून सर्व लुटारू पसार झाले. लुटारूंपैकी एकाच्या हातात पिस्तूल होते. त्यामुळे कुणीच विरोध करू शकले नाही, असे प्रवाशांनी सांगितले.

Back to top button