मराठा तरुणांना ‘नोटीसी’ द्याल तर ‘खबरदार’; मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा | पुढारी

मराठा तरुणांना 'नोटीसी' द्याल तर 'खबरदार'; मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आज (दि.२२) सायंकाळी शहरात राज्यातील ‘टॉप फाईव्ह’ मधील रेकॉर्डब्रेक विराट सभा झाली. यावेळी आम्ही मुंबईला येण्याचा सरकार एवढा धसका का घेत आहे?, आम्हाला मुंबईत येण्याचा हक्क अधिकार नाही का?, मुंबई आमची नाही का?, आम्ही महाराष्ट्राचे नाहीत का? असे अनेकाविध प्रश्न उपस्थित करत मुंबईला येण्याच्या पार्श्वभूमीवर सरकार जर मराठा तरुणांना नोटीसी देत असेल तर गाठ माझ्याशी आहे. मराठा तरुणाच्या केसाला जरी धक्का लागला तर सरकारला टोकाचे परिणाम भोगावे लागतील, असा थेट निर्वाणीचा इशारा आज (दि.२२) संध्याकाळी गंगाखेड येथे झालेल्या विराट सभेत मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

गंगाखेड येथील सभेसाठी मनोज जरांगे- पाटील यांचे सायंकाळी ७ वाजता शहरातील नवीन मार्केट यार्डातील सभास्थळी आगमन झाले.  गंगाखेड, पालम, सोनपेठ, पूर्णा व आजूबाजूच्या जिल्हा- तालुका परिसरातील सकल मराठा समाजबांधव सभास्थळी उपस्थित होते. सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुमारे २ लाख समाजबांधव सभास्थळी उपस्थित होते. यावेळी माझ्या ‘टॉप फाईव्ह’ सभेतील ही रेकॉर्डब्रेक विराट सभा असल्याचे मनोज जरांगे – पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच ही सभा नसून मराठा समाजाची वेदना असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना मनोज -जरांगे पाटील यांनी आजच्या सभेत थेट सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांनी मराठा समाजातील तरुणांना नोटीसा पाठवण्याचे सत्र सुरू केले आहे. या नोटीसा सरकारने तत्काळ रोखल्या नाहीत तर गाठ माझ्याशी आहे. मराठा समाजाच्या तरुणांच्या केसाला जरी धक्का लागला तरी गाठ माझ्याशी आहे. असे जरांगेनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच माता- भगिनींनो या लढाईचे खरे सुत्रधार तुम्ही आहात.  महिलांनीही आता गावोगावी जनजागृती करणे आवश्यक आहे, असेही सभेला उपस्थित महिलांना उद्देशून जरांगे -पाटील म्हणाले.

या सभेतही मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. आजच्या दिवशी छगन भुजबळ यांनी काहीतरी दबक्या आवाजात कुणकुण केली आहे. मी सभेत व्यस्त असल्याने नेमकी काय कुणकुण केली, हे अद्याप तपासले नाही. भुजबळ यांना शनिवारी (दि.२३) बीडच्या सभेत प्रत्युतर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा तरुणांना नोटीसी देण्याचा कट कोण करत आहेत, हे मला माहिती आहे. येत्या सभेत त्यांची नावे जाहीर करणार आहे. जो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येईल, भले तो कोणीही असेल त्याला आडवे केल्याशिवाय स्वस्थ बसू नका. मराठ्यांनी आपल्या लेकरांची व पुढील पिढींची काळजी असेल तर मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसू नका. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा लेक म्हणून मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका लावून धरणार आहे. मराठा आरक्षण दिल्याशिवाय मी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा अंतिम इशारा यावेळी जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला.

मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभरात झालेल्या ‘टॉप फाईव्ह’ सभेपैकी गंगाखेडची आजची सभा ठरली. सुमारे २ लाख मराठा समाजबांधव या सभेस उपस्थित होते. केवळ मराठा समाजबांधव उपस्थित नव्हते तर त्यांचा उत्साह, त्यांचा जोश हा वाखण्याजोगा होता.
परभणी जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली या सभेसाठी तगडा बंदोबस्त लावण्यात आला. जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील सुमारे ३०० पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच विविध तुकड्यांचा बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला. उपविभागीय अधिकारी डॉ.दिलीप टीपरसे व पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या नेतृत्वात पोलीस प्रशासनाने अत्यंत चोख बंदोबस्ताची भूमिका निभावली.

आजच्या सभेचे विशेष वैशिष्ट्य असे की, मराठा बांधवांच्या मदतीला ओबीसी बांधवांसह मुस्लिम समाज धावून आला. मुस्लिम समाजाने दिवसभर सभेसाठी येणाऱ्या नागरिकांची तसेच वाहनांची पार्किंग व्यवस्था अत्यंत चोखपणे सांभाळली. व्यासपीठावर मनोज जरांगे- पाटील यांचे आगमन होताच मुस्लिम समाज व धनगर समाजबांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा : 

Back to top button