विद्यमान खासदारांची कमी ‘माजीं’नी काढली भरून! | पुढारी

विद्यमान खासदारांची कमी ‘माजीं’नी काढली भरून!

सुषमा नेहरकर-शिंदे

शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे लोकांना भेटत नाही, मतदारसंघात फिरकत नाहीत, सर्वसामान्य लोकांच्या अडचणी, समस्या सांगायच्या तरी कुणाला असा प्रश्न मतदार व सर्वसामान्य लोक, कार्यकर्त्यांना पडतोय. लोकांची ही अडचण लक्षात घेऊन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पद नसतानाही गेले पाच वर्षे मतदारसंघात सक्रिय असल्याचे लोकांनी पाहिले. शिरूर लोकसभेतील सहाही मतदारसंघांत नियमित दौरे, गावभेटी, सतत विविध विकासकामांचे उद्घाटने करत गेले. त्यांनी पाच वर्षांत मतदारसंघ पिंजून काढला.

संबंधित बातम्या :

आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपल्याला सहज व गरजेच्या वेळी भेटावे ही माफक अपेक्षा मतदारांची असते, परंतु शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना गेले पाच वर्षे आपल्या खासदारांना भेटण्यासाठी महिनोन्महिने वाट पाहावी लागते. अडचणीच्या वेळी तर खासदार कधीच भेटत नाहीत, अशा तक्रारी आहेत. मतदारसंघातील लोकांची अडचण लक्षात घेऊन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आपल्याकडे कोणतेही पद नसताना गेले पाच वर्षे मतदारसंघात सक्रिय असल्याचे निदर्शनास आले.

गेल्या एक ते दीड वर्षात तर आढळराव पाटील यांनी प्रत्येक मतदारसंघात गावभेट दौरे करत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. हवेली तालुका गावभेट दौरा, शिरूर तालुका गावभेट दौरा, आंबेगाव तालुका गावभेट दौरा करत गावांना भेटी देणे, लोकांमध्ये गावांत जाऊन समस्या, अडचणी समजून घेणे, दौर्‍यावर असताना विविध विकासकामांची उद्घाटने करणे, गावात आणखी काही विकासकामे करणे आवश्यक आहे का हे समजून घेत तशी विकासकामे करणे, अशा प्रकारे गेल्या पाच वर्षांत आढळराव पाटील हे पद नसतानाही लोकांसाठी कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यमान खासदारांचा बॅकलॉग माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भरून काढला, अशी चर्चा मतदारसंघात आहे.

Back to top button