Salim Kutta : कोण आहे सलीम कुत्ता? नाशिकशी काय संबंध? | पुढारी

Salim Kutta : कोण आहे सलीम कुत्ता? नाशिकशी काय संबंध?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य संशयितांपैकी मोहम्मद सलीम शेख ऊर्फ सलीम कुत्ता (Salim Kutta) हा एक आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा शॉर्प शूटर म्हणून त्याला ओळखले जायचे. त्याचबरोबर साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड टायगर मेमन याच्यासोबतही त्याचे संबंध होते. सलीम हा मुळचा उत्तर प्रदेशातील नजीबाबाद येथील कल्हेडी गावातील रहिवासी होता. पण अंडरवर्ल्डशी जोडला गेल्याने, त्याने मुंबईत आपले बस्तान बसविले होते. कुत्र्याप्रमाणे गुरगुरण्याची सवय असल्याने गुन्हेगारी क्षेत्रात त्याला ‘सलीम कुत्ता’ नावाने ओळखले जायचे. त्याच्यावर दहशवादी स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा नृत्य करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर कोण सलीम कुत्ता? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण समोर आलेला व्हिडीओ हा नाशिकमधील असल्याने, त्याचा नाशिकशी काय संबंध याचा प्रामुख्याने शोध घेतला जात आहे. दरम्यान, सलीम कुत्ता याला साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अटक केल्यानंतर त्याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आणले आहे. सन २०१६ मध्ये जेव्हा तो पॅरोलवर कारागृहाबाहेर आला होता, तेव्हाचा हा व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. नाशिकमध्ये एका ठिकाणी पार्टी आयोजित करून त्याठिकाणी सुधाकर बडगुजर यांच्यासह अन्य काही लोक पार्टीत सहभागी झाल्याचे व्हिडीओमधून दिसते. पार्टीच्या ठिकाणी सलीम कुत्ता हा रेंज रोव्हर कारमधून पोहोचल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. सलीम कुत्ता याच्या पॅरोल रजेच्या शेवटच्या दिवसाच्या रात्री या पार्टीचे आयोजन केल्याचे बोलले जाते. दरम्यान, व्हिडीओमध्ये आणखी कोण आहेत, याचा तपास करण्याचे काम गुन्हे शाखेकडून केले जात आहे.

आडगाव परिसरात रंगली होती पार्टी (Salim Kutta) 

पार्टीचा जो व्हिडीओ समोर आला आहे, तो व्हिडीओ नाशिकमधील आडगाव परिसरातील असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. ही पार्टी मध्यरात्रीपर्यंत रंगल्याचेही समोर येत असून, यामध्ये विविध पक्षांचे नेते सहभागी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. नाशिकमधील एका व्यावसायिकाने या पार्टीचे आयोजन केल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

नाशिकमध्ये नातेवाईक?

सलीम कुत्ता हा मुळचा उत्तर प्रदेश येथील असून, त्याचे जवळचे नातेवाईक नाशिकमध्ये वास्तव्यास होते, अशीही माहिती समोर येत आहे. नाशिकरोड, उपनगर परिसरात त्याचे नातेवाईक वास्तव्यास होते. त्यामुळे त्याचे नाशिकमध्ये येणे-जाणे असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा :

Back to top button