Dry Day : श्रिया पिळगावकरचा ‘ड्राय डे’ आणि चाहत्यांमध्ये उत्सुकता | पुढारी

Dry Day : श्रिया पिळगावकरचा 'ड्राय डे' आणि चाहत्यांमध्ये उत्सुकता

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्राईम व्हिडीओचा ‘ड्राय डे’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. व्यसन, प्रेम, कुटुंबातील पुरुषाला करावा लागणारा त्याग या भोवती या चित्रपटाचे कथानक फिरते. (Dry Day) सौरभ शुक्ला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मोनिषा अडवाणी, मधू भोजवानी, आणि निखिल अडवाणी यांनी एम्मे एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विनोदी धाटणीच्या या चित्रपटात जितेंद्र कुमार, श्रिया पिळगावकर आणि अन्नू कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Dry Day)

संबंधित बातम्या –

या चित्रपटाचा एक्स्लुझिव्ह प्रिमिअर प्राईम व्हिडिओवर होणार आहे. २२ डिसेंबर, २०२३ रोजी भारतासह २४० देशांमध्ये हा चित्रपट पाहता येऊ शकेल. ‘ड्राय डे’ चित्रपटाची कहाणी समाजातील रुढी, परंपरांविरोधात उभ्या ठाकलेल्या नायकाची आहे. नव्याने बाप झालेला हा नायक आपल्या बाळासाठी रुढी-परंपरांना आव्हान देतो असं दाखवण्यात आलं आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दारूमुळे कुटुंबावर, समाजावर काय परिणाम होतो, याची एक झलक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या जातात, त्यामागचे सत्य काय आहे याची जिज्ञासा मनात निर्माण व्हायला लागते.

‘ड्राय डे’ चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ शुक्ला यांनी या चित्रपटाबाबत बोलताना म्हटले की, “या चित्रपटात समाजातील त्रुटींवर व्यंगात्मक पद्धतीने भाष्य करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. चित्रपटात दुर्घटना घडतात मात्र त्यापाहूनही प्रेक्षक हसतो. भावोत्कट अशी ही ड्रामा फिल्म आहे. दारूच्या व्यसनाबाबत महत्त्वाचा संदेश देण्याचं काम या चित्रपटातून करण्यात आलं असून हा चित्रपट माझ्या वाट्याला आला हे मी माझं सौभाग्य समजतो. या चित्रपटाचा उद्देश प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबतच त्यांना विचार करायला भाग पाडणं हा देखील आहे.”

अभिनेता जितेंद्र कुमार याने या चित्रपटाबद्दल बोलताना म्हटले की, “ड्राय डे चित्रपट हा नाट्यमय विनोदी अंगाने सादर करण्यात आलेला चित्रपट आहे. या चित्रपटात मी ‘गन्नू’नावाचे पात्र साकारत आहे. हे पात्र रंगवणे म्हणजे माझ्यातील कलाकारासाठी एक नवे आव्हान होते. गन्नू, विश्वास संपादन करण्यासाठी त्याच्यासाठी अशक्यप्राय आव्हानांचा मुकाबला करतो. त्याचा हा संघर्ष हाच या चित्रपटाचा गाभा आहे. हा चित्रपट आणि माझी भूमिका प्रेक्षकांना कशी वाटते हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे.”

अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिने या चित्रपटात ‘निर्मला’ नावाचे पात्र साकारले आहे. तिने या चित्रपटाबद्दल बोलताना म्हटले की, “‘ड्राय डे’ मध्ये काम करण्याचा अनुभव हा खूप छान होता. हा चित्रपट तुमचे मनोरंजन करेलच शिवाय तुम्हाला विचार करण्यासही भाग पाडेल. चित्रपटात गन्नू आणि निर्मला यांच्यातील नाते रंगवताना फार मजा आली. प्रेमामुळे बदल कसा घडतो हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. यासोबतच चित्रपटामध्ये सामाजिक समस्येवरही भाष्य करण्यात आले आहे. सौरभ सर आणि एम्मे एंटरटेनमेंटसोबत काम करण्याचा अनुभव फारच छान होता. या चित्रपटाची कथा उत्तमरित्या लिहिण्यात आली असून, या चित्रपटाच्या निमित्ताने मला माझ्या फिल्मी आयुष्यातील पहिले होळीचे गाणी करण्याची संधी मिळाली.”

Back to top button