Maharashtra Assembly Winter Session : “फोटोसाठी एकत्र आलेल्या आमदारांचे चेहरे…”, रोहित पवारांची खोचक पोस्ट | पुढारी

Maharashtra Assembly Winter Session : "फोटोसाठी एकत्र आलेल्या आमदारांचे चेहरे...", रोहित पवारांची खोचक पोस्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपूरच्या अधिवेशनाची आठवण म्हणून विधानसभेच्या सर्व सदस्यांचे एकत्रित छायाचित्र काढण्याची प्रथा आहे. यंदाही विधानसभेच्या सर्व सदस्यांचे एकत्रित छायाचित्र काढण्यात आले. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फोटो शेअर करत  खोचक पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “फोटोसाठी एकत्र आलेल्या सर्वपक्षीय आमदारांचे चेहरे आज खुललेले दिसतायेत, पण…” (Maharashtra Assembly Winter Session)

Maharashtra Assembly Winter Session : चेहरेही खुलल्याशिवाय…

रोहित पवार यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवर विधानसभेच्या सर्व सदस्यांचे एकत्रित छायाचित्र पोस्ट करत एक खोचक पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमधून विधानसभेच्या सर्व सदस्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,”नागपूरमध्ये विधिमंडळाबाहेर फोटोसाठी एकत्र आलेल्या सर्वपक्षीय आमदारांचे चेहरे आज खुललेले दिसतायेत.. पण राजकारण विसरून राज्याच्या हितासाठी हेच सर्वपक्षीय आमदार असे नेहमीच एकत्र आले तर राज्यातील शेतकरी, कष्टकरी, युवा आणि इतर सर्वच घटकांचे चेहरेही असेच खुलल्याशिवाय राहणार नाहीत.”

एकत्रित छायाचित्र काढण्यावरुन नाराजीनाट्य, आणि…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारचे नागपूर येथे सुरू असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे शेवटचे अधिवेशन आहे. अधिवेशनाची आठवण म्हणून सर्व सदस्यांचे एकत्रित छायाचित्र काढण्याची प्रथा आहे. मात्र, गुरुवारी छायाचित्र काढण्याच्या नियोजनावरून विधिमंडळ प्रशासनात गोंधळ उडाला. विधानसभा सदस्यांचे एकत्रित छायाचित्र घेण्यासाठी गुरुवारी सकाळी 10.50 ची वेळ निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार विधान भवनासमोर आसनव्यवस्था केली होती. मात्र, सभागृह सकाळी 11 वाजता सुरू होईपर्यंत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत छायाचित्र काढण्याचा प्रयत्न झाला. अजित पवार यांनी आज बहुतांश सदस्य उपस्थित असल्याने प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर सभागृह 15 मिनिटे तहकूब करावे व छायाचित्र काढावे, असे सुचविले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही सूचना मान्य करीत प्रश्नोत्तराच्या तासानंतर छायाचित्र काढण्याचे मान्य केले.

अधिवेशनाची आठवण म्हणून सर्व सदस्यांचे एकत्रित छायाचित्र काढण्याची प्रथा आहे.
अधिवेशनाची आठवण म्हणून सर्व सदस्यांचे एकत्रित छायाचित्र काढण्याची प्रथा आहे.

राजशिष्टाचार पाळला गेला पाहिजे : जयंत पाटील

विधानसभेचे कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उशिरा आले. प्रथम निवडून आलेले आमदार हे पहिल्या रांगेत होते. तर ज्येष्ठ सदस्य हे शेवटच्या रांगेत होते. हे विधानसभा सदस्यांचे फोटोसेशन आहे, मंत्र्यांचे नाही. त्यामुळे एकत्रित छायाचित्र काढताना राजशिष्टाचार पाळला गेलाच पाहिजे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button