वीर खाजा नाईक यांच्या गावाला जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न डॉ. हिना गावित यांनी मांडला संसदेत | पुढारी

वीर खाजा नाईक यांच्या गावाला जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न डॉ. हिना गावित यांनी मांडला संसदेत

नंदुरबार पुढारी वृत्तसेवा : आदिवासी क्रांतिवीर तथा भिल समाजाचे राष्ट्रीय नायक खाजा नाईक यांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या व समस्त आदिवासी बांधवांना तीर्थक्षेत्र समान असलेल्या शिरपूर तालुक्यातील बाटवापाडा या गावाला जाणारा रस्ता अनेक वर्षापासून दुर्लक्षित व प्रलंबित असल्याबद्दल आज दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी संसद रत्न खासदार डॉ. हिना गावित यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला आणि त्या कामाला गती देण्याची प्रक्रिया वेगाने पार पाडण्याची मागणी मांडली.

दुर्गम भागातील आदिवासींच्या हक्कांचे प्रश्न असो की आदिवासी समाजाच्या भावनांचा प्रश्न असो,  लोकसभा अधिवेशनात त्यावर आवाज उठवून मांडणाऱ्या खासदार म्हणून संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित परिचित आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांचा डीबीटी प्रश्न, आदिवासींच्या हक्काच्या घरकुल प्रकरणातील भ्रष्टाचार आणि तत्सम अनेक प्रकरणांवर खासदार डॉक्टर हिना गावित संसदेत बोलताना यापूर्वीही पहायला मिळाल्या आहेत. आताही लोकसभेच्या चालू हिवाळी अधिवेशनात मोइत्रा यांची खासदारकी रद्दबातल करण्याच्या निर्णयाप्रसंगी डॉक्टर हिना गावित जोरदारपणे पक्षाची बाजू मांडताना दिसल्या. या पार्श्वभूमीवर वीर खाजा नाईक यांच्याशी संबंधित गावाचा प्रश्न आज दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी शुन्य काळात मांडल्यानंतर डॉक्टर हिना गावित यांच्याकडे धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील जनतेचे लक्ष पुन्हा एकदा वेधले गेले आहे. संसदेत बोलताना डॉ. हिना गावित म्हणाल्या, आदिवासी क्रांतिवीर तथा भिल समाजाचे राष्ट्रीय नायक खाजा नाईक यांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या व समस्त आदिवासी बांधवांना तीर्थक्षेत्र समान असलेल्या शिरपूर तालुक्यातील बाटवापाडा या गावाला जाणारा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित असून लोकसभा मतदारसंघातील लोकांची जुनी मागणी आहे. 2012 साली त्या रस्त्याविषयी प्राथमिक संमती मिळाली परंतु वन खात्याच्या अंतर्गत असल्यामुळे रखडला आहे. जनभावना लक्षात घेऊन लवकरात लवकर तो रस्ता करण्याविषयी कार्यवाही व्हावी; असेही खासदार डॉक्टर गावित म्हणाल्या.

हेही वाचा :

Back to top button