Dhule News : विकसित भारत संकल्प यात्रा आली दारी, शासकीय योजनांची माहिती देते घरोघरी

Dhule News : विकसित भारत संकल्प यात्रा आली दारी, शासकीय योजनांची माहिती देते घरोघरी
Published on
Updated on

धुळे  :  पुढारी वृत्तसेवा- भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ  लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'विकसित भारत संकल्प यात्रा' ही मोहिम  सुरू करण्यात आली आहे.  मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देणारा चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात फिरविला जात असून त्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील 63 हजार 591पेक्षा अधिक नागरिकांनी या यात्रेला भेट दिली आहेत.

जनजातीय गौरव दिनापासून सुरू झालेली ही यात्रा पहिल्या टप्प्यात लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या देशातील 110 जिल्ह्यात सुरू करण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून आपल्या धुळे जिल्ह्यासह उर्वरीत सर्व जिल्ह्यात यात्रा सुरू करण्यात आली असून 26 जानेवारीपर्यंत देशातील सर्व भागात पोहोचणार आहे. यात्रेच्या निमित्ताने लाभार्थ्यांशी संवाददेखील साधण्यात येत आहे.

धुळे जिल्ह्यात पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली 29 नोव्हेंबर पासून यात्रा सुरू करण्यात आली असून या यात्रेचा शुभारंभ खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते तसेच महापौर प्रतिभाताई चौधरी, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, महानगरपालिका आयुक्त अनिता दगडे-पाटील यांच्या उपस्थितीत झाला असून ही यात्रा 26 जानेवारी, 2024 पर्यंत संपुर्ण जिल्ह्यात जाणार आहे. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळापर्यत पोहचविण्याची संधी या यात्रेच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. धुळे जिल्ह्यास संकल्प यात्रेसाठी 5 एलईडी व्हॅन मिळाल्या असून 1 व्हॅन महानगरपालिका  व नगरपालिका क्षेत्रात तर 4 एलईडी व्हॅन धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यात जाणार असून एक व्हॅन दररोज दोन ग्रामपंचायतींमध्ये फिरणार आहे. याबाबतचे परिपूर्ण नियोजन या यात्रेचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार हे करीत आहेत.

ग्रामीण भागात आयुष्मान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, किसान क्रेडीट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान, हर घर जल-जलजीवन मिशन, जन धन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, नमो फर्टीलायझर या 17 योजनांबाबत माहिती देण्यात येत आहे.

आदिवासी भागासाठी सिकलसेल ॲनिमिया निर्मुलन कार्यक्रम, एकलव्य निवासी शाळेत प्रवेश, शिष्यवृत्ती योजना, वन धन विकास केंद्र आदींबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. तर शहरी भागात प्रधानमंत्री स्वनिधी योजना, पीएम विश्वकर्मा योजना, आयुष्मान भारत, उज्वला योजना, मुद्रा कर्ज, स्वच्छ भारत अभियान (शहरी), पीएम आवास योजना, पीएम ईबस सेवा, खेलो इंडिया, सौभाग्य योजना, वंदे भारत रेल्वे, उडान आदी विविध योजनांच्या जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.

माहिती प्रसाराद्वारे शासकीय योजनांबाबत जागरुकता निर्माण करण्यासोबतच संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणीदेखील यात्रेदरम्यान होत असल्याने या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विविध योजनांची माहिती देणारा दृकश्राव्य माध्यमाने सज्ज चित्ररथ या यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे. दृकश्राव्य माध्यमाद्वारे नागरिकांशी संवाद साधतांना त्यांना विविध योजनांची माहिती देणाऱ्या हस्तपत्रकांचे आणि कॅलेंडरचे वाटपही करण्यात येत आहे. यात्रेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेशही दाखविण्यात येत आहे. यात्रेला भेट देणारे नागरिक शपथ घेऊन  विकसित भारतासाठी संकल्प करीत आहेत.

शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिक आणि नैसर्गिक शेती व मृदा आरोग्य पत्रिकेवरील चर्चा ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरत आहे. स्थानिक पातळीवर यश संपादन केलेल्या महिला आणि खेळाडूंचा सत्कार हेदेखील या यात्रेचे वेगळे वैशिष्ट्य आहे. यात्रेदरम्यान आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी आणि किसान क्रेडीट कार्ड नोंदणी करण्यात येत आहे.

धुळे जिल्ह्यात 10 डिसेंबर पर्यंत 104 पेक्षा अधिक ग्रामपंचायती आणि धुळे महानगरपालिका क्षेत्रातील वार्डांत ही यात्रा पोहोचली असून नागरिकांचा यात्रेला चांगला प्रतिसाद लाभत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 63 हजार 591पेक्षा अधिक नागरिकांनी या यात्रेला भेट दिली आहेत. ही यात्रा धुळे तालुक्यात 23 ठिकाणी, साक्री तालुक्यात 40, शिरपूर तालुक्यात 18 तर शिंदखेडा तालुक्यात 23 ठिकाणी पोहचली आहे. या यात्रेदरम्यान प्रत्येक ठिकाणी महसुल, जिल्हा परिषद तसेच महापालिका, नगरपालिका प्रशासनासह इतर विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करीत असून नागरिकांना विविध योजनांचा लाभदेखील देण्यात येत आहेत. या यात्रेला भेट देऊन शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. देशाच्या विकासाचा संकल्प घेऊन ही यात्रा आपल्या दारापर्यंत येत आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news