Employees Provident Fund : पीएफ खात्यात जमा होत नसेल तर काय कराल? | पुढारी

Employees Provident Fund : पीएफ खात्यात जमा होत नसेल तर काय कराल?

 

सुचित्रा दिवाकर

भविष्य निर्वाह निधी हा कर्मचार्‍यांसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक आधार मानला जातो. निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचे काम पीएफ करते; मात्र एखाद्या कर्मचार्‍याच्या वेतनातून प्रॉव्हिडंड फंड कापला जात असेल आणि तो पीएफ खात्यात जमा होत नसेल, तर अशावेळी कर्मचार्‍याची स्थिती बिकट होते. अशावेळी तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.

अडचण पडताळून पाहा : पीएफ खात्यात पैसे जमा होत नसल्याबद्दल तक्रार करण्यापूर्वी प्रशासकीय पातळीवर काही चूक आहे का, हे पडताळून पाहा. कपात केलेली रक्कम आणि खात्यात जमा असलेली रक्कम तपासा. सॅलरी स्लिप, सॅलरी विवरण आणि पीएफ पासबुक पाहा. आकड्यात घोळ वाटत असेल, तर पुढच्या टप्प्यात जा.

एचआरशी संवाद करा : आपल्या कंपनीच्या मनुष्यबळ विभागाशी (एचआर विभाग) संवाद करा. आपण गोळा केलेली माहिती सादर करा. पीएफ जमा होत नसल्याबद्दल विचारणा करा. सौहार्दपूर्ण मार्गाने या समस्येचे निराकरण करता येऊ शकते.

इपीएफओकडे तक्रार करा : कंपनीचा, संस्थेचा एचआर विभाग प्रतिसाद देत नसेल, तर कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडे (इपीएफओ) तक्रार करा. त्याच्या संकेतस्थळावर तक्रारीच्या सेक्शनमध्ये जा. तेथे विवरण सादर करा. त्यात पीएफ खाते क्रमांक, कंपनीची माहिती आणि तक्रारीचे स्वरूप याचा उल्लेख करा.

उमंग अ‍ॅपचा वापर करा : इपीएफओने आपल्या सेवेला युनिफाईड मोबाईल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नेस (उमंग) अ‍ॅपमध्ये सामील केले आहे. उमंग अ‍ॅप डाऊनलोड करा आणि पीएफचे पैसे जमा न झाल्यास या अ‍ॅपच्या मदतीने कंपनीविरुद्ध तक्रार करा.

कामगार खात्याशी संपर्क : इपीएफओच्या माध्यमातूनही यश येत नसेल, तर स्थानिक कामगार खात्याशी संपर्क करून हे प्रकरण पुढे नेता येऊ शकते. ते आपल्याला मार्गदर्शन करू शकतात आणि कधी कधी आपल्या वतीने हस्तक्षेपही करू शकतात.

शेवटचा उपाय कायदेशीर कारवाई : सर्व मार्गांचा अवलंब करूनही आपण अपयशी राहत असू, तर कायदेशीर कारवाईचा विचार करायला हवा. या पर्यायाला जाणून घेण्यासाठी कामगार वकिलांचा सल्ला घ्या आणि पीएफचे पैसे जमा न केल्याबद्दल कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करा; पण यात वेळ आणि खर्च बराच लागू शकतो. म्हणून हा शेवटचा पर्याय ठेवावा.

हेही वाचा : 

 

Back to top button