भाजपसोबत जायचे नाही, ही आमची स्पष्ट भूमिका : शरद पवार | पुढारी

भाजपसोबत जायचे नाही, ही आमची स्पष्ट भूमिका : शरद पवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली, तिचा अध्यक्ष कोण आहे, हे सर्वांना माहीत आहे. ज्यांनी माझ्यावर आरोप केले, ते चांगल्या राजकारणासाठी केलेले नाहीत. त्यामुळे त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. त्यातील बर्‍याच गोष्टी मला पहिल्यांदाच समजल्या, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आरोपांना दिले. भाजपसोबत जायचे नाही, अशी आमची स्पष्ट भूमिका होती, याचा पुनरुच्चारही पवार यांनी केला.

कर्जत येथे शुक्रवारी झालेल्या मंथन शिबिरात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी शरद पवारांबाबत विविध गौप्यस्फोट केले. शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजीनामा परत घेण्यासाठी त्यांनीच आंदोलन करायला लावल्याचा आरोप केला. तसेच अनिल देशमुखही आमच्याबरोबर यायला तयार होते. पण भाजपने मंत्रिपद देण्यास विरोध केल्याने ते महायुतीत आले नाहीत, असा दावा अजित पवार यांनी केला होता.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शनिवारी पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, अशोक पवार, शशिकांत शिंदे, अरुण लाड, संदीप क्षीरसागर, अंकुश काकडे, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

निर्णय घेण्यास मी सक्षम

शरद पवार म्हणाले, मी पक्षाचा अध्यक्ष असल्याने अनेकजण माझ्याकडे अनेक प्रश्नांबाबत संवाद साधण्यासाठी येतात. मी पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत कोणाशी चर्चा करण्याची मला गरज वाटली नाही. राजीनाम्याची घोषणा केली, त्यावेळी अनेकांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून विनंत्या केल्या, आंदोलन केल्याचे तुम्हीही पाहिले आहे. यामध्ये तिकडे गेलेल्यांचाही समावेश आहे. मला बदल करायचा असेल तर आनंद परांजपे किंवा जितेंद्रची परवानगी घ्यायची गरज नाही.

माझी स्वत:ची निर्णय घेण्याची कुवत आहे, असे शरद पवार म्हणाले. बाहेर पडलेल्यांवर लोकांचा विश्वास नाही. त्यांना आता लोकांपुढे जावे लागणार आहे. त्यामुळे आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत, असे त्यांना वारंवार सांगावे लागत आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत ते राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून लोकांसमोर गेले होते, असे शरद पवार यांनी अजित पवार गटावर टीका करताना स्पष्ट केले.

समाजात तेढ नको

मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे-पाटील करीत असलेल्या मागणीबाबत शरद पवार यांनी थेट भाष्य करण्याचे टाळले. मुख्यमंत्री आणि राज्यकर्ते यांना त्याबाबत विचारा, असे ते म्हणाले. राज्यात शांतता हवी आहे. रास्त मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, ती मागणी संसदीय पद्धतीने व दोन समाजामध्ये वाद होणार नाही, अशा पद्धतीने करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही : अनिल देशमुख

शरद पवार यांच्यासोबत असलेले काही आमदार आमच्यासोबत सत्तेत येणार, असा दावा अजित पवार गटातील नेत्यांनी कर्जत येथे केला. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासंदर्भातही वक्तव्य करण्यात आले. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना देशमुख म्हणाले, भाजपने मला खोट्या केसेसमध्ये गोवले. अजित पवार यांना मी साथ द्यावी यासाठी मंत्री हसन मुश्रीफ पाच तास माझ्या घरी येऊन विनंती करत होते. ज्या पक्षाने मला खोट्या आरोपांमध्ये गुंतवले, मला मारले, त्यांच्यासोबत मी येणार नाही, मी शरद पवार साहेबांसोबतच राहणार, असे त्याच वेळी सांगितल्याचे देशमुख म्हणाले.

पवार म्हणाले…

  • लोकशाहीमध्ये सर्वांना भूमिका मांडायचा आणि निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे बारामतीमधून कोणाला उमेदवारी द्यायची, हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे.
  • भाजपसोबत गेलेले सहकारी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक कोणाच्या सहीच्या तिकिटावर लढले, हे निवडणूक आयोगाला माहिती आहे.
  • पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जाऊन तुम्ही पहाटेचा शपथविधी करता, मग तो पक्षाच्या धोरणाचा भाग कसा असेल?
  • आमच्यासोबत किती आमदार, खासदार आहेत हे वेळ आल्यावर सांगेन.
  • अजित पवारांनी मागच्या निवडणुकीत माझ्या नावाने मते मागितली.
  • पक्ष सोडून गेलेले परत कितीजण निवडून येतात, याचा इतिहास एकदा तपासून पाहा.
  • देशातील लोक बदलाच्या स्थितीमध्ये आहेत. मात्र, पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतरच त्यावर बोलणे योग्य ठरेल.
  • इंडिया आघाडीमध्ये जागावाटपाची प्राथमिक बोलणी सुरू आहेत. अंतिम निर्णय झालेला नाही.

हेही वाचा

Back to top button