IPL 2024 : आयपीएल मिनी लिलावासाठी, 1166 खेळाडूंची नोंदणी

IPL 2024 : आयपीएल मिनी लिलावासाठी, 1166 खेळाडूंची नोंदणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आयपीएल 2024 (IPL 2024) पूर्वी मिनी लिलावासाठी एकूण 1,166 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये रचिन रवींद्र आणि ट्रॅव्हिस हेड यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांनी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. मात्र, त्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे नाव नाही, त्याला मुंबई इंडियन्सने करारमुक्त केले आहे. 1,166 खेळाडूंपैकी 830 खेळाडू भारतीय आहेत. यापैकी 18 कॅप्ड खेळाडू आहेत; परंतु फक्त चार खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे.

आयपीएलचा लिलाव 19 डिसेंबरला होणार आहे. या लिलावासाठी 336 परदेशी खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. एकूण 212 कॅप्ड, 909 अनकॅप्ड आणि 45 सहयोगी देशांचे खेळाडू आहेत. भारताच्या कॅप्ड खेळाडूंमध्ये वरुण अ‍ॅरोन, के. एस. भरत, केदार जाधव, सिद्धार्थ कौल, धवल कुलकर्णी, शिवम मावी, शाहबाज नदीम, करुण नायर, मनीष पांडे, हर्षल पटेल, चेतन साकारिया, मनदीप सिंग, बरिंदर स्रान, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, हनुमा विहारी, संदीप वारियर आणि उमेश यादव यांच्या नावांचा समावेश आहे.

या 4 भारतीय खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये (IPL 2024)

'क्रिकबझ'च्या रिपोर्टनुसार, हर्षल पटेल, केदार जाधव, शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. या सर्व खेळाडूंना फ्रँचायझींनी करारमुक्त केले आहे. उर्वरित 14 कॅप्ड भारतीय खेळाडूंची मूळ किंमत 50 लाख रुपये आहे. जोफ्रा आर्चरने लिलावासाठी आपले नाव का नोंदवले नाही, यावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही; परंतु दुखापतीमुळे तो यंदाच्या लिलावात नसल्याची चर्चा आयपीएल संघांमध्ये होती.

1,166 खेळाडूंपैकी…

830 खेळाडू भारतीय आहेत. यापैकी 18 कॅप्ड खेळाडू आहेत; परंतु फक्त चार खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे.
336 परदेशी खेळाडूंनी नावे नोंदवली आहेत. यात एकूण 212 कॅप्ड, 909 अनकॅप्ड आणि 45 सहयोगी देशांचे खेळाडू आहेत.

रचिन रवींद्रची बेस प्राईस 50 लाख

विश्वचषकात धमाकेदार कामगिरी करणारा न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र हा यंदाच्या मिनी लिलावाचे मुख्य आकर्षण असणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेत 578 धावा करून सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकणार्‍या रचिनची बेस प्राईस 50 लाख रुपये असल्याचे 'ईएसपीएन क्रिकइन्फो'ने म्हटले आहे.

2 कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू (IPL 2024)

हर्षल पटेल, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, केदार जाधव, मुजीब उर रहमान, शॉन अ‍ॅबॉट, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, स्टिव्ह स्मिथ, मुस्तफिजूर रहमान, टॉम बँटन, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, लॉकी फर्ग्युसन, जेराल्ड कोएत्झी, रिले रॉसौ, रॅसी व्हॅन डेर डुसेन, अँजेलो मॅथ्यूज.

1.5 कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू

मोहम्मद नबी, मॉईसेस हेन्रिक्स, ख्रिस लिन, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, डॅनियल वॉरॉल, टॉम कुरेन, मर्चंट डी लँग, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, टायमल मिल्स, फिल सॉल्ट, कोरी अँडरसन, कॉलिन मुन्रो, जिमी नीशम, टीम साऊदी, कॉलिन इंग्राम, वानिंदू हसरंगा, जेसन होल्डर, शेरफेन रदरफोर्ड.

1 कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू

अ‍ॅश्टन आगर, रिले मेरेडिथ, डी'आर्सी शॉर्ट, अ‍ॅश्टन टर्नर, गुस अ‍ॅटकिन्सन, सॅम बिलिंग्स, मायकेल ब्रेसवेल, मार्टिन गुप्टिल, काईले जेमिसन, अ‍ॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, अल्झारी जोसेफ, रोव्हमन पॉवेल, डेव्हिड विसे.

इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या खेळाडूंची नावे

लिलावात इंग्लंडच्या अनेक खेळाडूंनी आपली नावे दिली आहेत. यामध्ये विश्वचषक खेळलेल्या आदिल रशीद, हॅरी ब्रूक आणि डेव्हिड मलान या खेळाडूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, सीन अ‍ॅबॉट, जोश इंग्लिस आणि स्टिव्ह स्मिथ यांचा समावेश आहे. ज्यांनी त्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली आहे.

जगभरातील खेळाडूंची नोंदणी

बांगला देशकडून मोहम्मद शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, महेदी हसन मिराज, मुस्तफिजूर रहमान, महमुदुल्लाह आणि तस्किन अहमद यांचा समावेश आहे. एकट्या मुस्तफिजूरची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तसेच दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे, नामिबिया, नेपाळ, नेदरलँड, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिकेचे खेळाडू आहेत.

फक्त 77 स्लॉट

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) फ्रँचायझींना लिलावात हव्या असलेल्या खेळाडूंची नावे सांगण्यास सांगितले असून, त्यांनी नावे दिलेली नाहीत. जर खेळाडू पात्र आणि इच्छुक असेल, तर त्याचे नाव लिलावात समाविष्ट केले जाईल. फ्रँचायझींनाही लिलावात हव्या असलेल्या खेळाडूंच्या यादीसह रजिस्टरला प्रतिसाद देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फक्त 77 स्लॉट भरायचे आहेत, त्यापैकी जास्तीत जास्त 30 परदेशी खेळाडू असू शकतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news