नगर महापालिकेची शास्तीमध्ये सरसकट 75 टक्के सूट | पुढारी

नगर महापालिकेची शास्तीमध्ये सरसकट 75 टक्के सूट

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेत दिवसेंदिवस थकबाकीदारांचा आकडा वाढत चालला आहे. आजही 65 हजार 319 मालमत्ताधारकांकडे 215 कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे आयुक्तांनी 50 हजारांच्या आतील थकबाकीदारांना शास्तीमध्ये 75 टक्के सूट दिली होती. मात्र, आमदार संग्राम जगताप यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी शास्तीमध्ये सरसकट 75 टक्के सूट द्यावी, अशी मागणी केली होती. ही मागणी विचारात घेऊन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी थकीत मालमत्ताधारकांना सरसकट शास्तीमध्ये 75 टक्के माफी दिली आहे. महापालिकेच्या मालमत्ताधारकांची थकबाकी वर्षानुवर्षे वाढत आहे. गेल्या आठ महिन्यात अवघी 31 कोटी 17 लाख रुपये इतकी वसुली झाली. अद्याप 215 कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी थकीत मालमत्ताधारकांना 9 डिसेंबर रोजी होणार्‍या लोकअदालतीमध्ये येण्याबाबत नोटिसा काढल्या आहेत.

50 हजारांच्या आतील थकबाकीदारांना शास्तीमध्ये 75 टक्के सवलत दिली होती. दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन शास्तीमध्ये सरसकट 75 टक्के सूट देण्याची मागणी केली. तीच मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनीही केली. त्यामुळे आयुक्तांनी 9 डिसेंबरला लोकअदालत होणार आहे. त्यापूर्वी 1 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत शास्तीमध्ये 75 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी शास्तीमध्ये सूट मिळाल्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Back to top button