Konkan-Vengurla Tourism : गर्द झाडीतल्या आरवली, मोचेमाडला नक्की जा! | पुढारी

Konkan-Vengurla Tourism : गर्द झाडीतल्या आरवली, मोचेमाडला नक्की जा!

स्वालिया शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क :

शिरोडा नजीक असणारे वेंगुर्ला हे पर्यटन स्थळ नजरेत भरणारे आहे. फोंडा घाटापासून दिड तास अंतरावर वेंगुर्ला हे ठिकाण आहे. वेंगुर्लापासून गोवा हे केवळ तीन तास अंतर आहे. वेंगुर्ला बाजार जसे वर्दळीचे ठिकाण तसे पुढे पुढे गेल्यानंतर ही वर्दळ कमी होताना दिसतेय. असंख्य ख्रिश्चन बांधवांची जुनी घरे आणि जुन्या गावाचे फिल देणाऱ्या वस्त्या, सर्वांचे लक्ष वेधून घेतात. (Konkan-Vengurla Tourism) प्रचंड पावसामुळे उतरत्या छपराची कोकणी पद्धतीची कौलारू घरे शहरी माणसांसाठी कुतुहलाचा भाग ठरतो. एकूणच वेंगुर्ला गर्द झाडीत वसलेला आहे. पोफळीच्या, सुपारीच्या बागा, केळीच्या बागा, काजूची मळे, नारळाची झाडे, असंख्य नानाविध प्रकारच्या झाडे, फुलांनी सजलेल्या वेगुर्ल्याला एकदा का होईना, भेट द्यायला हवी! (Konkan-Vengurla Tourism)

संबंधित बातम्या –

कसे जाल वेंगुर्ल्याला?

कोल्हापूर-राधानगरी अभयारण्य रोड-फोंडा घाट-फोंडा-पनवेस कोची कन्याकुमारी हायवे-कुडाळ तिठ्ठा-वेंगुर्ला बेळगाव रोड-वेंगुर्ला.

मानसीश्वर मंदिर

मानसीश्वर मंदिर – 

मंदिरात नेहमीसारखी मूर्ती दिसत नाही. निराळ्या पद्धतीचे मंदिर हे वेगळेपण दर्शवते.

कसे जाल मानसीश्वर मंदिराला? 

वेंगुर्ला बाजारातून पुढे गेल्यानंतर रस्त्यालगत मानसीश्वरचे मंदिर आहे.

घावण-चटणी

सागरेश्वर बीच – 

सागरेश्वर समुद्रकिनारा निवांत आणि शांत आहे. वाहणारे खारे वारे शरिराला स्पर्शून गेल्यानंतर आपल्याला कोकण फील नक्कीच येईल. अनेक नौका समुद्रावर हेलकावे घेताना दिसतील. रात्रीच्या वेळी तुम्ही येथे कॅम्प फायर करून खळखळणाऱ्या समुद्राचा आनंद घेऊ शकता.

सागरेश्वर बीच येथे कुठे राहाल? 

सागरेश्वर बीच किनारी अनेक सुविधा आहेत. अनेक होम स्टे, हॉटेल्स आहेत. टेंटमध्येदेखील राहण्याची सोय येथे केली जाते.

हँगिंग वुडेन हट्स –

सागरेश्वर बीच किनारी अनेक हँगिंग वुडेन हट्स आहेत. येथे अनेक मराठी अभिनेत्रींनी भेट दिलेली आहे. फोटोशूटसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. लाकडापासून बनवलेले हे हट्स तुम्हाला फोटो काढण्यास मोहात पाडतात.

ऑबझरव्हेशन ब्रीज व परिसर

वेंगुर्ला ऑबझरव्हेशन ब्रीज – वेंगुर्ला बंदर – वेंगुर्ला लाईट हाऊस – 

वेंगुर्ल्यातील ऑबझरव्हेशन ब्रीज नव्याने बांधण्यात आले आहे. या ब्रीजवरुन संपूर्ण समुद्राचे दर्शन आणि वेंगुर्ला लाईट हाऊस पाहता येते. ब्रीजवरून काही अंतरावर वेंगुर्ला वाईट हाऊस आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी जा. विद्युत रोषणाईने नटलेले वेंगुर्ला लाईट हाऊस नजरेत भरणारे आहे. (Konkan-Vengurla Tourism)

वेंगुर्ला ब्रीज जवळचं नवबाग बीच आहे, जो खूप सुंदर, पांढऱ्या वाळूचे आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे.

किंग प्रॉन्झ

काय खाल? 

वेंगुर्ला परिसरात काही ठिकाणी घरगुती खानावळी आहेत. तेथेही तुम्ही जेवू शकता. सिवाय रेस्टॉरेंट, हॉटेल्स उपलब्ध आहेत. अस्सल कोकणी पद्धतीचे जेवणदेखील येथे मिळते. यामध्ये विविध प्रकारचे मच्छिकरी, मासे, बांगडा, पापलेट, रोहू, कटला, सुरमई, किंग कोळंबी, मच्छी, गोलमा, झिंगे, कडी भात, तांदळाची भाकरी,अंडाकरी, चिकन तर शाकाहारमध्ये चपाती, भाजी, भात, लोणचे, पापड, वरण, श्रीखंड, उकडी मोदक, नाश्ताला शहाळे, घावणे-चटणी, चहा, पोहे, भजी इ. काहींना ताडी-माडीदेखील पिणे आवडते.

बांगडा

मोचेमाड बीच –

हे बीच मोचेमाड गावात लपलेले आहे. थोडेसे आडवळणी असल्यामुळे येथे वेळ काढून जावे. अथांग पसरलेला समुद्र तोही विशालकाय जागेमध्ये जो आधी आपण कधी पाहिला नसेल असा, पाढंरी वाळू, सभोवताली नारळाची झाडे, खारफुटीची जंगल आणि समुद्राच्या लाटा धडकून शिंपल्यांनी सजलेली अनेक मोठे खडक लक्ष वेधून घेतात. समुद्री शेवाळ, शिंपले आणि काळ्याकुट्ट पसरलेल्या दगडांमध्ये असंख्य खेकड्यांची घरे दिसतात. या खडकांमध्ये प्रचंड संख्येने असणारी विविध जातीची खेकडे आणि समुद्री जीव दिसतात. शांतता आणि निवांत ठिकाण असेल तर हे परफेक्ट ठिकाण आहे. इथे बालीचं फिल नक्कीच येईल!

मोचेमाड किनारा

कसे जाल मोचेमाडला ?

वेंगुर्ला शहरापासून मोचेमाड बीच १० किलोमीटर अंतरावर आहे. वेंगुर्ला ते शिरोडा रोड दरम्यान एक फाटा (छोटा रस्ता) लागतो, जे मोचेमाड गाव म्हणून ओळखले जाते. मोचेमाड ग्रामपंचायतीचा फलक आणि बीचची माहिती देणारे फलक येथे दिसते. या फाट्यातून आत जाताना खूप छोटे छोटे रस्ते लागतात. मोचेमाडची खाडी देखील रस्त्यामध्ये नजरेस पडते. पुढे गेल्यानंतर स्थानिक रहिवाशांना मोचेमाड बीच कोणत्या दिशेला हे विचारून जावे. कारण खूप छोटे छोटे रस्ते आणि पायवाटा असल्यामुळे बीचला जाणारा रस्ता सहजासहजी सापडत नाही. पण, काही अंतरावर गेल्यावर गाडी पार्क करून ५ मिनिट चालत जावे लागते. त्यानंतर मोचेमाडचा विशालकाय समुद्र दृश्यास नक्की पडतो. (Konkan-Vengurla Tourism)

मोचेमाड

वेतोबा मंदिर – 

आरवली गावातील हे जागृत देवस्थान असून पुरातन दुमजली मंदिर पाहायला मिळते. प्रसिद्ध वेतोबा मंदिराची ख्याती निराळी आहे. येथे नवसाला केळीचा घड दिला जातो. तर अशी मान्यता आहे की, संरक्षण करण्यासाठी वेतोबा हा पूर्ण गावभर फिरत असतो. त्यामुळे त्याचे जोडे झिजतात. म्हणून त्याला नवीन जोडे दिले जातात. हे जोडे आकाराने खूप मोठे असून १५० वर्षे जुने आहेत. ते एका काचेच्या कपाटात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. ते तुम्ही मंदिरात गेल्यानंतर पाहू शकता.

वेतोबा मंदिरात वाहिलेल्या चपला

वेतोबा मंदिर कसे जाल? 

वेंगुर्लेपासून १२ किमी अंतरावर आणि मोचेमाडपासून जवळ असणारे वेतोबा मंदिर आहे. वेंगुर्ला-शिरोडा रोडवर रस्त्याच्या बाजूलाच वेतोबाचे मोठे मंदिर आहे.

वेतोबा देवस्थान

आरवली बीच – 

आरवलीच्या समुद्रकिनारी चुलीवर भाजलेल्या काजूंचा आस्वाद घेता येतो. वेंगुर्ल्यातून जात असताना घरगुती फलक पाहायला मिळतात, जिथे चुवीवर भाजलेले काजू मिळतात. स्थानिक मच्छिमार ताडे मासे पकडण्यासाठी रापण लावताना दिसतात. स्थानिक बाजारात या माशांचा लिलिवदेखील होतो, तिथून तुम्ही ताजे मासे खरेदी करू शकता. बाजारात काजूपासून बनवलेल्या अनेक मिठाई, काजूगर, सॉल्ट काजू, काजू चॉकलेट्स आणि ड्रायफ्रूट्स खरेदी करू शकता.

सुरमई मच्छी- करी

आरवली परिसरात काय पाहाल? 

प्रमुख आकर्षणांपाकी रेडी गणेश मंदिर, तेरेखोल समुद्र, तेरेखोल चर्च किल्ला. येथील शिरोडा मीठागरालादेखील भेट द्याला विसरू नका.

मोचेमाड समुद्र किनाऱ्यावरील खडक

आरवली कसे जाल? 

गोवा विमानतळ जवळ आहे. जवळचे रेल्वे स्टेशन सिंधुदुर्ग आणि झारप रेल्वे स्थानक आहे. शिवाय एमएसआरटीसीच्या एसटी देखील उपलब्ध आहेत.

ही सर्व ठिकाणे फिरताना वेंगुर्ल्यातच राहणे सोईस्कर ठरेल. याठिकाणी तुम्हाला राहणे, खाण्याच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील.

सातेरी भद्रकाली मंदिर

आणखी काय पाहाल?

वेंगुर्ला मासळी बाजार, केपा देवी मंदिर, डच फॅक्टरी, गर्द झाडीतील श्री नारायण मंदिर, श्री देव तांबळेश्वर मंदिर, सातेरी भद्रकाली मंदिर, सागरेश्वर मंदिर.

हिरव्यागार झाडीतलं कोकणी घर

Back to top button