मनमाडचा रेल्वे पूल कोसळल्याने विंचूर प्रकाशा महामार्गावरील वाहतूक ठप्प | पुढारी

मनमाडचा रेल्वे पूल कोसळल्याने विंचूर प्रकाशा महामार्गावरील वाहतूक ठप्प

लासलगाव(जि. नाशिक) : वार्ताहर मनमाड शहरातून जाणारा इंदूर-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन जुना रेल्वे पूल बुधवारी मध्यरात्री कोसळल्यामुळे इंदूर-पुणे महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विंचूर प्रकाशा महामार्गावरून वळवल्याने लासलगाव विंचूर मार्गावर वाहतूक वाढल्याने या महामार्गावर दोन्ही बाजूकडील वाहतूक संथ गतीने सुरू असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.

लासलगाव पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव व विंचूर येथे पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे. या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.

तीन दिवसानंतर ढगाळ वातावरण निवळल्याने कडक ऊन पडले, त्यामुळे लासलगाव बाजार समितीच्या आवारावर कांद्याची आवक वाढली. सकाळच्या सत्रात ५८३ वाहनांचा कांद्याचा लिलाव होऊन व्यापाऱ्यांच्या खळ्यात कांदा उतरवण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी झाल्याने याचा देखील वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे वाहतूक विस्कळित झाली आहे. लवकरात लवकर या पुलाची नव्याने दुरुस्ती करण्यात यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

Back to top button