Nashik Crime : शाळकरी मुलाचे अपहरण करुन हत्येप्रकरणी सात जणांना अटक | पुढारी

Nashik Crime : शाळकरी मुलाचे अपहरण करुन हत्येप्रकरणी सात जणांना अटक

सिडको : पुढारी वृत्तसेवा; मागील भांडणाची कुरापत काढून डोक्यात राग धरत राजा गब्बर सिंग (वय १६ रा. स्वामीनगर, अंबड) या शाळकरी मुलाचे अपहरण करून त्याच्या हत्येप्रकरणी अंबड पोलीस ठाणे व चुंचाळे पोलीसांनी सात संशयित आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले. या संशयितांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सर्व संशयितांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. २४) सायंकाळच्या सुमारास मयत राजासिंग याचे संशयितांसोबत अंबड येथील दत्तनगरात भांडण आणि हाणामारी झाली होती. याच भांडणाचा राग मनात ठेवत निखील पगारे (१९ ,रा. मोरे, वरचे चुंचाळे), प्रविण गोवर्धने (२१ अंजली पार्क, दत्तनगर), शुभम कडुसकर (23, रा. दत्तनगर), अमन खरात (२४, घरकुल चुंचाळे), संतोष वाघमारे (२३, दातीरनगर), सिध्दार्थ दाभाडे (२३, चुंचाळे) तसेच अशोक साळवे (२२, चुंचाळे) यांनी शनिवारी (दि. २५) सायंकाळी अंबडगाव येथून राजासिंग याचे अपहरण करून विल्होळी येथील एका खडीक्रशरजवळ आणले व त्या ठिकाणी केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. तो मयत झाल्याचे लक्षात येताच संशयितांनी त्यास राजूर बहुला परिसरातील एका निर्जनस्थळी फेकून दिले. पोलिसांकडून राजा सिंग या अल्पविनाचा शोध सुरू असताना वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी गुराख्याला मृतदेह आढळल्याने त्याने पोलिसांना माहिती दिली. तो राजासिंग याचा असल्याचे निष्पन्न झाले.

अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ तसेच एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही ठिकाणचे गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी मारेकरांना अंबड तसेच घरकुल भागातून ताब्यात घेतले. तर तिघा संशयितांना माजलगाव (बीड) या भागातून ताब्यात घेतले. या संशयितांना पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना २ डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली.

हेही वाचा :

Back to top button