Happy Birthday Virat Kohli : विराट कोहली झाला 35 वर्षांचा! जाणून घ्या त्याचे ‘हे’ 35 मोठे विक्रम | पुढारी

Happy Birthday Virat Kohli : विराट कोहली झाला 35 वर्षांचा! जाणून घ्या त्याचे ‘हे’ 35 मोठे विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : Happy Birthday Virat Kohli : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली आज 35 वर्षांचा झाला आहे. कोहलीसाठी वय हा फक्त एक आकडा आहे आणि त्यापेक्षा जास्त काही नाही. कारण विराट हा त्याच्या फिट बॉडी आणि फिटनेससाठी जगभर प्रसिद्ध आहे. अशा या क्रिकेटरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराटने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हा तो अवघ्या 20 वर्षांचा होता. तेव्हापासून त्याने क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटवर वर्चस्व गाजवले आहे. काही वर्षांतच तो महान खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. क्रिकेटचा देव अशी ओळख असणा-या सचिन तेंडुलकरच्या नावावर असे अनेक विक्रम होते जे कोणीही मोडू शकणार नाही असे वाटत होते, पण विराटने क्रिकेटच्या देवालाही मागे टाकले. इतिहास रचत विराटने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. सातत्यपूर्ण धावा वसूल करत असल्यामुळे रन मशीन तर धावांचा पाठलाग करताना संघाला सामना जिंकून देण्याच्या क्षमतेमुळे विराटला चेस मास्टर म्हणतात. चलातर विराटच्या 35 व्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या 35 विक्रमांबद्दल नजर टाकूया.

विराट कोहलीचे 35 विक्रम (Happy Birthday Virat Kohli)

1. एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करण्याचा जागतिक विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये 10 शतके झळकावली आहेत.
2. तो जगातील एकमेव खेळाडू आहे ज्याने वनडे विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात शतक आणि टी-20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले आहे.
3. तीनही फॉरमॅटमध्ये 10 किंवा त्याहून अधिक प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकणारा विराट जगातील एकमेव खेळाडू आहे. विराटने कसोटी सामन्यात 10 वेळा, एकदिवसीय सामन्यात 40 वेळा आणि टी-20 सामन्यात 15 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे.
4. विराट कोहली हा असा खेळाडू आहे जो टी-20 मध्ये सर्वाधिक 7 वेळा प्लेअर ऑफ द सिरीज ठरला आहे.
5. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक 4008 धावा केल्या आहेत.
6. विराटने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 38 अर्धशतके झळकावली आहेत.
7. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 20 वेळा प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार जिंकला आहे.
8. विराट कोहलीची वनडेत फलंदाजीची सरासरी 58.04 आहे. 50 पेक्षा जास्त डाव खेळलेल्या फलंदाजांमधील ही सर्वोच्च सरासरी आहे.
9. वनडेमध्ये सर्वात जलद 8000, 9000, 10000, 11000, 12000, 13000 धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे.
10. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वात जलद 3000 धावा करण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर आहे.
11. विराटने सर्वाधिक 15 टी-20 सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत.
12. एका आयपीएल हंगामात सर्वाधिक 973 धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
13. विराट कोहलीने एका कॅलेंडर वर्षात 8 वेळा एकदिवसीय सामन्यांमध्ये 1000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
14. त्याने लक्ष्याचा पाठलाग करताना विजयी सामन्यांमध्ये 5786 धावा वसूल केल्या आहेत.
15. वनडेमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक 26 शतके झळकावली आहेत.
16. भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना विराटच्या खात्यात 33 विजयाची नोंद आहे.
17. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा विराट हा आशियातील पहिला कर्णधार आहे.
18. कसोटीत सर्वाधिक 7 द्विशतके झळकावणारा विराट एकमेव भारतीय फलंदाज आहे.
19. द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक 558 धावांचा जागतिक विक्रम त्याच्या नावावर आहे.
20. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात त्याच्या नावावर सर्वाधिक 1141 धावा आहेत.
21. टी-20 विश्वचषकात सर्वाधिक 14 अर्धशतके झळकावली आहेत. इतर कोणात्याही फलंदाजाने किमाअ 10 अर्धशतकेही नाहीत.
22. विराट हा सलग दोन टी-20 विश्वचषकांमध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार जिंकणारा एकमेव खेळाडू आहे.
23. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक 7 शतके झळकावणारा फलंदाज आहे. त्याने केवळ एका हंगामात (2016) चार शतके झळकावली होती.
24. तो कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक 5864 धावा करणारा भारतीय फलंदाज आहे.
25. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 70 शतके ठोकली आहेत.
27. विराट हा आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या स्पर्धेत 3000 धावा करणारा जगातील एकमेव फलंदाज आहे.
28. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 549 डावात 25000 धावा करणारा तो सर्वात वेगवान फलंदाज आहे.
29. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 2818 धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे.
30. एकदिवसीय क्रमवारीत सर्वाधिक रेटिंग (911) विराटनेच कमावले आहेत.
31. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक 610 धावा करणारा विराट हा भारतीय फलंदाज आहे.
32. कर्णधार म्हणून 9 वेळा कसोटीत 150+ धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.
33. वनडेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा कोहली हा पहिला आशियाई फलंदाज आहे.
34. तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा विराट कोहली एकमेव भारतीय आहे.
35. कर्णधार म्हणून खेळताना विराट सर्वाधिक 16 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

Back to top button