Manoj Jarange-Patil : जरांगे-पाटलांवर उपचार सुरु होणे आवश्यक, अन्यथा…डॉक्टरांचा गंभीर इशारा | पुढारी

Manoj Jarange-Patil : जरांगे-पाटलांवर उपचार सुरु होणे आवश्यक, अन्यथा...डॉक्टरांचा गंभीर इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खूपच खालावली आहे. त्यांना धड उभेही राहता येत नाही. जरांगे-पाटील स्टेजवरच कोसळले. त्यावेळी त्यांना तिथे असलेल्या दोघांनी सावरले आणि आधार दिला. अंतरावाली सराटीत जरांगे- पाटील यांचे सहाव्या दिवशी ही आमरण उपोषण सुरुच आहे. तसेच सलाईन व उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्याचा गंभीर परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला आहे. (Manoj Jarange-Patil)

दरम्यान, जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरु होणे गरजेचे आहे, अशी एक पोस्ट फेसबुक व्हायरल झाली. आहे. डॉ. प्रकाश कोयाडे यांनी जरांगे यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करणारी माहिती या पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरुच ठेवले तर..संभाव्य कोणते धोके उद्भवू शकतात? याबद्दल कोयाडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

प्रकाश कोयाडे पोस्टमध्ये लिहितात, ” अन्न न खाता माणूस फक्त पाण्यावर साधारणपणे तीन ते चार आठवडे जगू शकतो तर अन्न आणि पाणी दोन्ही शिवाय साधारणपणे एक आठवडा माणूस जगू शकतो. अगदी शंभर टक्के प्रत्येकवेळी हे असंच घडतं असं नाही तर त्या व्यक्तीचं शरीर, भौतिक परिस्थिती, मानसिक स्थिती बऱ्याच गोष्टींचा थोडाफार फरक पडतो. जरांगे पाटलांचा आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. माईक हाती धरताना त्यांचे हात थरथरत होते. हे लक्षण काही ठीक नाही… व्यक्तीचं वजन बऱ्यापैकी असेल तर अन्न न मिळाल्यामुळे आधी शरीरातील फॅट वापरलं जातं आणि शरीराला तग धरायला वेळ मिळतो. एकदा का फॅट संपलं की शरीरातील मांसपेशी तुटू लागतात कारण शरीराकडे उर्जा मिळविण्याचा तो एकच पर्याय असतो. अशावेळी प्रतिकूल लक्षणं दिसायला लागतात जशी की, अशक्तपणा, चक्कर येणं, त्यातीलच एक म्हणजे हे हातांची थरथर!

या दरम्यान तयार झालेले किटोन्स फार घातक ठरतात. खरंतर बोलू नये पण परिस्थिती अशी आहे म्हणून लिहावं लागतंय. या लक्षणांची परिणीती फार अवघड होऊ शकते. अगदी ब्लड प्रेशर कमी होणं, अवयव निकामी होणं, हृदयाची गती मंदावणं, हृदयाचा झटकासुद्धा… माझी पुढचं काही बोलायची इच्छा नाही! एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता त्यांची अवस्था एवढी नाजूक आहे की, आत्ता…‌ अगदी या क्षणी वैद्यकीय उपचार सुरू होणं आवश्यक आहे! जरांगे पाटील🙏🏼… माणूस वाचला पाहिजे… वेळ फार कमी आहे! काहीतरी निर्णय होणं आवश्यक आहे. एक डॉक्टर म्हणून हे बघवत नाही…”

हेही वाचलंत का?

Back to top button