Lalit Patil Case : ललित पाटीलच्या कारवरून शिवसेना नेत्याच्या वाहनचालकाची चौकशी | पुढारी

Lalit Patil Case : ललित पाटीलच्या कारवरून शिवसेना नेत्याच्या वाहनचालकाची चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; ड्रग्ज माफिया ललित पानपाटील-पाटील याच्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. अशातच ललित वापरत असलेली व सद्यस्थितीत भंगार अवस्थेत पडलेल्या कारवरून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या वाहनचालकाची पोलिसांनी चौकशी केली आहे. ही कार चालकाने गॅरेजला लावली होती, मात्र दुरुस्तीचे पैसे दिले नसल्याची माहिती गॅरेजचालकाने पोलिसांना दिली. (Lalit Patil Case)

ललित हा ड्रग्जच्या व्यवहारात जाण्यापूर्वी राजकीय क्षेत्रात वावरत होता. सुरुवातीस रिपाइं व नंतर शिवसेना पक्षातून राजकारणात सक्रिय सहभाग ललित घेत होता. ललितच्या राजकीय प्रवेशासोबत त्याचा वावर, संपर्क कोणासोबत होता यावरून राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. मात्र कोणीही ललितला आपण वैयक्तिक ओळखत नसल्याचा दावा केला नाही. दरम्यान, सिडकोतील बडदेनगर परिसरानजीक एका गॅरेजलगत उभी असलेली ललितची कार चर्चेत आली. याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता ही कार राजकीय पदाधिकाऱ्याच्या वाहनचालकाने आणल्याची माहिती गॅरेजचालकाने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी चालकाची चौकशी केली. त्यानुसार ललित हा पक्षकार्यालयात येत असल्याने ओळख झाली. वाहनाचा अपघात झाल्याने त्याची कार गॅरेजमध्ये ठेवली. मात्र, ललितने पैसे न दिल्याने व गॅरेजचालकाचे फोनही न उचलल्याने कार तशीच पडून असल्याची माहिती चालकाने पोलिसांना दिल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणी पोलिस संबंधित राजकीय व्यक्तीचीही चौकशी करणार का याबाबत पोलिस दलात चर्चा सुरू आहे. (Lalit Patil Case)

गॅरेजचालकाचे पैसे रखडले

ललित हा सफारी कार वापरत होता. मात्र, ही कार अपघातग्रस्त झाल्याने बडदेनगर परिसरातील गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी लावली होती. मात्र, दुरुस्तीचे पैसे मिळत नसल्याने गॅरेजचालकाने ललितसह व राजकीय पदाधिकाऱ्याच्या चालकाशी संपर्क साधून पैशांची मागणी केल्याचे समजते. मात्र, दोघांनीही पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने ही कार तेथेच धूळ खात पडून आहे. त्यामुळे ही कार भंगार स्थितीत आहे.

हेही वाचा :

Back to top button