नाशिकच्या अधोगतीला पालकमंत्री जबाबदार; राऊतांचा भुसे, भुजबळांवर निशाणा | पुढारी

नाशिकच्या अधोगतीला पालकमंत्री जबाबदार; राऊतांचा भुसे, भुजबळांवर निशाणा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या ड्रग्ज रॅकेटवरुन संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे व माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. नाशिकच्या अधोगतीला सध्याचे पालकमंत्री व ज्यांची पालकमंत्री पदासाठी धडपड सुरु आहे असे दोघेही नेते जबाबदार असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत हे नाशिक दौ-यावर असून ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. नाशिकला गुन्हेगारीचा विळखा पडला असून शाळा महाविद्यालयांना देखील ड्रग्जचा विळखा आहे. नाशिक ड्रग्जचा अड्डा, उडता नाशिक अशी स्थिती आहे. नाशिकच्या शिंदे गावात ड्रग्जचे इतके मोठे रॅकेट उगाच सुरु नव्हते, यात पोलिस यंत्रणाही सामील असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. हा विषय राजकीय नसून सामाजिक आहे. याविरोधात 20 तारखेला नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढणार असून वेळ पडली तर नाशिक बंद करु तसेच ड्रग्ज माफियांना पाठिशी घालणा-या नेत्यांच्या गाड्या अडवू असा इशारा राऊत यांनी दिला.

राज्याचे गृह खाते अस्तित्वातच नाही. गृहमंत्री हा पोलिस खात्याच्या सर्व यंत्रणा राजकारणासाठी वापरत आहे. फडणवीस सत्तेत आल्यावर नागपूरसह महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली. नाशिकचं नागपूर होऊ देणार नाही असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button