

जालना : पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणाच्या जी.आर.वर ठाम असलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांची मनधरणी करण्यासाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन व इतर नेत्यांना मंगळवारी पुन्हा अपयश आले. गिरीश महाजन यांनी एका महिन्यात प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगत जरांगे-पाटील यांच्याकडे वेळ मागितला; पण जरांगे-पाटील यांनी उपोषणावर ठाम राहत फक्त चार दिवसांची मुदत सरकारला दिली आहे. चर्चेची फेरी निष्फळ ठरल्यानंतर सरकारचे शिष्टमंडळ बुधवारी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीला येणार असून, सरकारच्या वतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. Manoj Jarange Patil
जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अतुल सावे, संदीपान भुमरे यांचे शिष्टमंडळ अंतरवाली येथे सायंकाळी आले होते. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, अर्जुन खोतकर हे चर्चेत सहभागी झाले. महाजन यांनी जरांगे यांच्याकडे महिनाभराची मुदत मागितली. कोर्टात टिकणारे आरक्षण करणे गरजेचे आहे, त्यासाठी वेळ हवा असल्याचे महाजन म्हणाले. Manoj Jarange Patil
तथापि जरांगे यांनी आपली भूमिका बदलली नाही. सरकारसोबत चर्चा झाली आहे. मागील 50 वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. जीआर घेऊन येत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आरक्षणाबाबतचा कायदेतज्ञ आणि काही न्यायाधीशांशी चर्चा झाली आहे. आरक्षणासाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पाठवले आहे. त्यांच्या प्रकृतीची सरकारला काळजी वाटते. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक पावले उचलत असल्याचे महाजन यांनी सांगितले. यापूर्वी आमचे सरकार असताना आरक्षण दिले होते. दुर्दैवाने पुढे ते न्यायालयात टिकले नाही, तसे यापुढे होणार नाही ही काळजी सरकार घेत असल्याचे महाजन यांनी जरांगे यांना सांगितले. Manoj Jarange Patil
यावेळी मंत्र्यांनी चर्चेसाठी जरांगे यांना मुंबईला घेऊन जाण्याची तयारी दर्शविली. त्यास जरांगे यांनी नकार दिला. मी माझ्या जातीला फसवू शकत नाही. जी काही चर्चा आहे, ती सगळ्यांसमोर होऊ द्या असे ते म्हणाले. मराठवाड्यातील मराठ्यांनी काय चूक केली की, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही, असे म्हणत जरांगे यांनी मंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. Manoj Jarange Patil
मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, त्यासंबंधीचा जीआर आणा-मगच मी उपोषण मागे घेतो, अनेक चांगल्या घरांमधील मराठा समाजाची मुले आत्महत्या करताहेत. सरकारी भरती होते, त्यात मराठ्यांना स्थान मिळत नाही. मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होऊ द्यात. तुम्ही देवदूत व्हा, आरक्षण दिले तर मराठवाड्यातील हा मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल, पण तोपर्यंत उपोषण मी मागे घेणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितल्यावर मंत्र्यांचाही नाइलाज झाला. Manoj Jarange Patil
जरांगे म्हणाले की, मागील महिन्यात सरकारने वेळ मागितली होती. तेव्हा चार दिवसांच्या ऐवजी आठवडाभर वेळ दिला. पण सरकारने निर्णय घेतला नाही. आता मी तुम्हाला एक महिन्याचा वेळ देऊ शकत नाही. कारण शेवटी हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. समाजाचा रोष मी माझ्या अंगावर घेऊ शकत नाही. घरी कुटुंबाला सांगितलंय, आलो तर तुमचा नाही तर समाजाचा होईन… निघाली तर आरक्षणाची जल्लोषयात्रा निघेल नाहीतर माझी प्रेतयात्रा, पण आता माघार नाही, असा आक्रमक पवित्रा जरांगे यांनी घेतला. Manoj Jarange Patil
गिरीश महाजन यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केल्यानंतर माइकवर ते उपस्थित नागरिकांशी चर्चा करीत असताना काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. यावेळी जरांगे यांनी त्यांना थांबविले. संपूर्ण आयुष्यं घोषणाबाजी करण्यात गेले आहे. त्यामुळे आता आपल्याला आरक्षण हवे आहे. फक्त घोषणाबाजी करून काय करणार. सराकरचं शिष्टमंडळ आले असून, त्यांच्यासोबत चर्चा करू असे ते म्हणाले. Manoj Jarange Patil
मंगळवारी सायंकाळी चर्चेतून कोणताही तोडगा न निघाल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी तेथून बाजूला जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर वरिष्ठ नेत्यांशी मोबाईलवरून अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा केली. चर्चेचा तपशील त्यांनी नेत्यांच्या कानावर टाकल्याचे समजते. दरम्यान, चर्चेच्या फेरीत कोणताही तोडगा न निघाल्याने सरकारचे शिष्टमंडळ उद्या, बुधवारी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीला येणार आहे आणि चर्चा करणार आहे. Manoj Jarange Patil
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गात कुणबी जातीअंतर्गत मराठा कुणबी वा कुणबी मराठी ही जात समाविष्ट आहे. सदरील मराठा कुणबी वा कुणबी मराठी ही जात म्हणजेच मराठा जात आहे, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मराठवाडा महसुली विभागातील मराठा जातीचा उल्लेख असलेल्या व्यक्तींना कुणबी जातीचे दाखले देण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. त्यांची ही मागणी मान्यदेखील झाली असल्याचे बोलले जात आहे; पण फक्त दाखले नव्हे, तर त्यासोबत आरक्षणदेखील मिळाले पाहिजे, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली आहे. Manoj Jarange Patil
हेही वाचा :