माजी मुख्यमंत्र्यांसोबत वावरणाऱ्याच्या ईडी कार्यालयात वानखेडेशी भेटीगाठी कशासाठी?: नवाब मलिक | पुढारी

माजी मुख्यमंत्र्यांसोबत वावरणाऱ्याच्या ईडी कार्यालयात वानखेडेशी भेटीगाठी कशासाठी?: नवाब मलिक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा

भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांसोबत वावरणारी एक व्यक्ती मागील काही दिवसांपासून ईडी कार्यालयात समीर वानखेडे यांच्या गाठीभेटी घेत आहे. या नेमके गौडबंगालाबाबत आपण नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात पोलखोल करणार आहोत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे.

सदर व्यक्ती चेंबूर येथे राहणारी असून माजी मुख्यमंत्री त्याच्या घरीही जात होते. त्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये सहज प्रवेश होता. आता हा गृहस्थ ईडी कार्यालयात कुणासाठी जात आहे, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे. समीर वानखेडेवर भाजपचे प्रेम असेल तर त्याला उघडपणे भेटा. दूताच्या माध्यमातून कशाला भेटता, अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर दाऊद वानखेडे याने धर्म बदलला नाही, असे वक्तव्य माध्यमांकडे केले आहे. याबाबत मलिक म्हणाले, एखाद्याच्या तक्रारीवर चौकशी करून तसा रिपोर्ट सादर करून संसदेकडून यावर शिफारस मागितली पाहिजे. परंतु तसे न करता तुम्ही माध्यमातून परस्पर क्लीन चीट कशी काय देऊ शकता, असा प्रश्न मलिक यांनी हलदर यांना केला आहे.

वानखेडे याने धर्म बदलला नाही, हे तुम्ही बोलत आहात हे सत्य आहे. कारण तो जन्मापासूनच मुसलमान आहे. त्याच्या वडिलांनी धर्म बदलला होता. दोन्ही मुले लहानपणापासून मुसलमान आहेत आणि मुसलमान पध्दतीने जगले आहेत. शनिवारी आपण एका व्यक्तीचा फोटोही ट्वीट केला. तो समीर वानखेडे याच्या बहिणीचा नवरा आहे. आज तो युरोपच्या वॅनिसमध्ये राहतो. मुळचा तो सुरतचा राहणारा आहे. जिचा नवरा आहे तिने ट्वीट करुन हा फोटो का आणला, अशी विचारणा मलिक यांनी केली.

जात पडताळणी समितीकडे तक्रार करणार

हलदर यांनी काहीही म्हटले असले तरी आमच्या अधिकारानुसार आम्ही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे व जात पडताळणी समितीकडे तक्रार करणार आहोत. तसेच आपण धर्म आणि जातीची लढाई लढत नाही. जातीच्या आधारावर फसवणूक करून सरकारी नोकरी मिळविलेल्या वानखेडे याने दलित तरुणांचा अधिकार हिरावून घेतला आहे. त्याविरोधात आपली लढाई आहे. हलदर यांनी आपल्या पदाची गनिमा राखावी, असेही मलिक म्हणाले.

हेही वाचलत का?

Back to top button