रायगड: जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी शनिवारीपासून (दि.२९) पुढील पंधरा दिवसांकरिता पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) (Ambenli Ghat) रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी प्रसिद्ध केली आहे.
आंबेनळी घाट (Ambenli Ghat) रस्ता हा अरूंद व घाट वळणाचा आहे. रस्त्याच्या बाजूला असणारा डोंगरकडा अतिवृष्टीमुळे कोसळून डोंगरावरील माती व मोठमोठे दगड रस्त्यावर येतात. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खोल दरी असल्याने हा घाट रस्ता वाहतुकीस धोकादायक आहे.
या रस्त्यावरून वाहतूक सुरू ठेवल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात यावा. पर्यायी रस्ता पोलादपूर खेड-चिपळूण-पाटण- कराड-कोल्हापूर तसेच पाटणकडून सातारामार्गे पुण्याकडे असा पर्यायी मार्ग सुरू ठेवावा, असा अहवाल रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे.
या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी, महाड यांनी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या अधिसूचनेनुसार पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता पुढील १५ दिवस बंदी करण्याचा आदेश जारी केला आहे.
हेही वाचा