Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरेंना सत्ता का राबवता आली नाही? सामनाच्या मुलाखतीत दिले उत्तर... | पुढारी

Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरेंना सत्ता का राबवता आली नाही? सामनाच्या मुलाखतीत दिले उत्तर...

पुढारी ऑनलाइन डेस्क : Uddhav Thackeray Interview : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी प्रदीर्घ मुलाखत घेतली. आवाज कुणाचा या पॉडकास्टच्या माध्यामातून ही मुलाखत घेण्यात आली. यावेळी सध्याच्या राजकीय घडामोडी, तसेच देशात घडणाऱ्या घडामोडी, नैसर्गिक आपत्ती आणि इतर अनेक बाबींवर मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका देखील केली. यावेळी संजय राऊतांनी ठाकरे यांना सत्ता का राबवता आली नाही असा प्रश्न विचारला असता त्यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले.

संजय राऊत : ‘इंडिया’वर मी येणारच आहे, पण ज्या प्रकारचं सत्तेचं राजकारण, हव्यास, स्वार्थ जो महाराष्ट्रात चालू आहे. तुमचीही सत्ता होती, पण आताचं चित्र पाहिलं की असं म्हटलं जातं की, उद्धव ठाकरेंना सत्ता राबवताच आली नाही…

Uddhav Thackeray Interview : गद्दारांमुळे मला सत्ता राबवता आली नाही

उद्धव ठाकरे : संजय राऊत यांच्या या प्रश्नाला उद्धव ठाकरे यांनी गद्दारांमुळे मला सत्ता राबवता आली नाही, बरे झाले असे गद्दार निघून गेलेत, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले, ”हे बघा. मला जे करायचं होतं ते मी केलं. सध्याचं चित्र तुम्ही म्हणताय ते पाहिलं तर या पद्धतीने मी सत्ता राबवू इच्छित नाही आणि माझ्याकडून ती तशी राबवली पण जाणार नाही. जर मला सत्ता टिकवायची असती तर जे गद्दार होते ते गद्दारी करण्यापूर्वी माझ्यासोबतच दोन-तीन दिवस होते. त्यांना हॉटेलमध्ये किंवा इतरत्र डांबून ठेवू शकलो असतो, पण असं किती दिवस डांबून ठेवणार. जी मनानेच विकली गेली आहेत ती माणसं मला नकोच आहेत. जी माझ्या सभोवती अगदी मूठभर का असतील, पण निष्ठावान असतील अशीच माणसं मला हवीत. कारण तीच खरी शक्ती असते. पसाभर गद्दार घेऊन फिरण्यापेक्षा मूठभर निष्ठावंत मला नेहमीच आवडतात. शिवसेनाप्रमुखांचासुद्धा हाच स्वभाव होता.”

Uddhav Thackeray Interview : संजय राऊत : त्या निष्ठावंतांच्या फौजा आजही आपल्याकडे आहेत?

– ”आहेतच. म्हणून तर मी म्हटलं ना की, त्यांना असं वाटलं होतं की एवढे फोडल्यानंतर शिवसेना संपेल, पण शिवसेनेला आणखी जोरात धुमारे फुटलेले आहेत. एका दृष्टीने ही इष्टापत्ती आहे. अनेक जणांनी अनेक जागा वर्षानुवर्षे अडवून ठेवल्या होत्या. बऱ्याच जणांना संधी मिळायला हवी होती ती मिळत नव्हती. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत होतो की ही व्यक्ती काम करते. पण मतदार म्हणत होते की, हरकत नाही. एकदा झालं, दोनदा झालं. यालाच वारंवार संधी मिळतेय. शेवटी हा शिवसेनेचाच आहे असं म्हणून मत देत होते, पण आता तिकडे नवीन चेहऱ्यांना संधी मिळतेय.”

हे ही वाचा :

ChatGPT Android App : चॅटजीपीटीचं अँड्रॉईड अ‍ॅप भारतात लॉंच; जाणून घ्या कसं करता येईल डाऊनलोड

Ajit Pawar & Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी घेतलीअजित पवारांची भेट; कारण….

Back to top button