Dhule accident news: पळासनेरजवळ भीषण अपघातात १० ठार; ३० जण जखमी | पुढारी

Dhule accident news: पळासनेरजवळ भीषण अपघातात १० ठार; ३० जण जखमी

धुळे; पुढारी वृत्तसेवा: मध्य प्रदेशाकडून खडी घेऊन धुळे शहराकडे येणारा भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी झालेल्या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू  (Dhule accident news) झाला. या अपघातात 30 जण जखमी झाले असून त्यांना शिरपूर आणि धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील चौघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या अपघातामुळे वाहनांमध्ये श्रमतेपेक्षा जास्त माल भरणे आणि महामार्गावरील अपघातांचा ब्लॅक स्पॉटचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ (Dhule accident news)  आज (दि.४) सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. पळसनेर गावाजवळ असणाऱ्या बस थांब्यावर नागरिक नेहमीप्रमाणे त्यांना गाड्यांची वाट पाहत उभे होते. यात काही विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता. या बस स्थानकाच्या जवळच असलेल्या सदगुरू हॉटेलमध्ये देखील काही वाहन चालक चहा तसेच अल्पपहारासाठी थांबलेले होते. याच वेळी मध्य प्रदेशाकडून भरधाव वेगाने आर जे 09 जीबी 9001 क्रमांकाचा कंटेनर भरधाव वेगाने आला. या कंटेनर चालकाने हॉटेल परमारजवळ नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या एका ट्रकला हुलकावणी दिली. त्या पुढे या कंटेनर चालकाने एका दुचाकीला देखील हुलकावणी दिली. परिणामी दुचाकी वरील दोघे तरुण जमिनीवर पडून किरकोळ जखमी झाले. मात्र,  कंटेनर चालकाचे गाडीवर नियंत्रण नसल्याची बाब निदर्शनास आल्याने काही तरुणांनी त्याचा पाठलाग सुरू केला. सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या पळासनेर गावाजवळ आल्यानंतर या कंटेनरने (एम एच 18 बी आर 50 75) कारला जोरदार धडक दिली. यानंतर पळासनेर बस स्थानकाजवळ उभ्या असलेल्या मोटारसायकली महेंद्र पिकअप गाडी तसेच एका स्कूल बसला धडक देत बस थांब्जयावळ असलेल्या हॉटेलला धडक देत हा खडीचा कंटेनर रस्त्याच्या कडेला उलटला.

हा अपघात झाल्यानंतर परिसरात एकच धावपळ सुरू झाली. गावातील तरुणांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. मात्र घटनास्थळावरील जखमी आणि मृतांचे आकडेवारी पाहता मदत करणाऱ्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान ही माहिती तातडीने पोलिसांना कळाली. त्यामुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, शिरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील ,नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ ,सांगवी पोलीस ठाण्याचे खलाणे, महामार्ग विभागाचे निरीक्षक हेमंतकुमार पवार, उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा तसेच नरेंद्र पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. अपघात झाल्यानंतर उलटलेल्या गाडीमधील खडी महामार्गावर पसरल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. त्याचप्रमाणे बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. परिणामी मदत कार्याला मोठ्या अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे पोलीस पथक तसेच महामार्ग पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने महामार्गावरील खडी दूर केली. त्याचप्रमाणे अपघात स्थळावरील पाचशे मीटरचा परिसर वगळता दोन्ही कडील रहदारी सुरू केली. त्यामुळे वाहतुकीची कोंडी दूर झाली. दरम्यान जखमींना तातडीने रुग्णालयात रवाना करण्यात आले .तर मयतांना देखील शवविच्छेदनासाठी शिरपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले.

Dhule accident news : १० जणांचा मृत्यू, ३० जखमी

मृतांमध्ये अपघात ग्रस्त कंटेनर चे चालक कन्हैयालाल बंजारा तसेच सुरपाल सिंह जवान सिंह राजपूत यांचा देखील समावेश आहे. बस थांब्यावर उभे असलेले असलेले प्रतापसिंग भीमसिंह गिरासे (वय 70 राहणार पळासनेर), निर्मला तेरसिंग पावरा( वय 17 राहणार कोळसापाणी पाडा) मुरी सुरसिंग पावरा( वय 28 राहणार कोळसापाणी पाडा) , पंकज पिंजा पावरा( वय ७, रा. कोळसापाणी), संजय जायमल पावरा (वय 38 रा. कोळसा पाणी) रितेश संजय पावरा (वय १४ रा. कोळसा पाणी) मृत झाले. तसेच कारमधील सुनीता राजेश खंडेलवाल (रा. धुळे) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तसेच धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना दशरथ पावरा यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या 10 वर पोहोचली आहे.

या अपघातात 30 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने शिरपूर येथील कुटीर रुग्णालय तसेच इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात हलवण्यात आले. यातील 20 जणांना धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. यातील चौघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान या अपघाताची माहिती मिळाल्याने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.

पालकमंत्री गिरीश महाजनांकडून विचारपूस

या भीषण अपघाताची माहिती कळाल्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने भ्रमणध्वनीवरून पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्याशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली. त्याचप्रमाणे जखमींच्या उपचारासाठी कोणतीही कुचराई होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना देखील दिली. या जखमींच्या विचारपूस करण्यासाठी पालकमंत्री महाजन हे मुंबई येथून धुळ्याकडे रवाना झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून ते वैद्यकीय महाविद्यालयातील जखमींची विचारपूस करणार आहे. दरम्यान नाशिक विभागाचे पोलीस महासंचालक डॉ बी जी शेखर पाटील हे देखील अहमदनगर येथून धुळे शहराकडे येण्यासाठी निघाले असून सायंकाळी उशिरा ते घटनास्थळाची पाहणी करणार असून जखमींची विचारपूस देखील करणार आहेत.

ओव्हर लोड आणि ब्लॅक स्पॉटचा विषय ऐरणीवर

दरम्यान या अपघातामुळे महामार्गावरील अपघातांच्या ब्लॅक स्पॉटचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचप्रमाणे महामार्गावरून ओव्हरलोड जाणाऱ्या गाड्यांवर नियंत्रण कोणाचे हा देखील विषय ऐरणीवर आला आहे. घटनास्थळावर मध्य प्रदेश कडून येताना मोठ्या प्रमाणे वळण रस्त्याला उतार आहे. त्यामुळे वाहन चालकांचे या ठिकाणी नियंत्रण राहत नाही. परिणामी पळासनेरला अनेक वेळेस लहान-मोठे अपघात होतात. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना या ठिकाणी उड्डाणपूल करण्याची मागणी देखील झाली. मात्र ठेकेदाराने त्याकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केल्याचा आरोप घटनास्थळावर असलेल्या अनेक नागरिकांनी केला. तर अपघात ग्रस्त कंटेनर मध्ये क्षमतेपेक्षा जास्त खडी भरल्याची बाब देखील अनेक प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी व्यक्त केली. क्षमतेपेक्षा जास्त खडी असल्यामुळे उतारावर या कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. परिणामी अनेक गाड्यांना धडकत त्याने निरपराध नऊ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याची प्रतिक्रिया देखील घटनास्थळावरील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा 

Back to top button