CM Shinde : कोल्हापुरात खंडपीठ होण्यासाठी प्रयत्न करणार: मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही | पुढारी

CM Shinde : कोल्हापुरात खंडपीठ होण्यासाठी प्रयत्न करणार: मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही

कोल्हापूर ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर शहरातील टोलचा प्रश्न दूर केला. त्यापद्धतीने कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी जातीने प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही देऊन पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबिल्याशिवाय राज्यातील युती सरकार स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१३) येथे व्यक्त केला. कोल्हापुरातील तपोवन मैदानावर आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे (CM Shinde) बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे (CM Shinde) म्हणाले की, कोल्हापूरची माती ही छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आहे. इथल्या मातीने संघर्ष शिकवला आहे. कोल्हापूरकर सर्व संकटांना मुकाबला करून सामोरे जात असतो. काहीतरी जगावेगळे करायचे असे कोल्हापूरकरांच्या मनात असते. कोल्हापूरकारांचा विषय हार्ड असतो. शासन आपल्या दारी कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ही गर्दी बघून विरोधकांचा टांगा पलटी घोडे फरार झाला आहे. जिकडे नजर पोहोचत नाही तिकडे लोकं आहेत. नागरिकांना शासकीय कामासाठी खेटे मारावे लागू नये, यासाठी हा कार्यक्रम राबविला जात आहे. सर्व ठीकाणी जाऊन हा शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतला जात आहे.

सुरुवातीला मी आणि फडणवीस दोघेच मंत्री होतो. त्यानंतर जे कॅबिनेट झाले. त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी निर्णय घेतले. राज्यातील युती सरकार सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्याच्या हितापेक्षा दुसरा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. ज्या पद्धतीने पंतप्रधान यांनी शेतकऱ्यांसाठी 6 हजार रूपये देण्याची योजना सुरू केली. त्याच धर्तीवर आम्ही सुद्धा महाराष्ट्र शासनाकडून 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुधारीत दराने नुकसानभरपाई देण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १५०० कोटींच्या निधीला मान्यता दिली.

युती सरकारने २९ सिंचनाचे प्रकल्प मंजूर केले आहेत. नमो शेतकरी योजनेतर्गंत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रूपये मिळणार आहेत. त्याचबरोबर लेक लाडकी योजनेंतर्गंत मुलीला १८ व्या वर्षी १ लाख मिळणार आहेत. मागील अडीच वर्षात ठाकरे सरकराने कामांना स्थगित दिली होती. परंतु राज्यातील डबल इंजिनाच्या सरकारने सर्व स्पीड ब्रेकर हटवले आहेत. केंद्राच्या पाठिंब्यामुळे राज्यात अनेक योजना राबविल्या जात आहेत. प्रत्येक प्रस्ताव केंद्राकडून काटछाट न करता मंजूर केला जात आहे. राज्यात मुख्यमंत्री म्हणून मला आणि उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पसंती दिली जात आहे, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button