Ashadhi Wari 2023: आषाढी सोहळ्यासाठी 'बलराज' अश्व देहूकडे रवाना | पुढारी

Ashadhi Wari 2023: आषाढी सोहळ्यासाठी 'बलराज' अश्व देहूकडे रवाना

अकलूज; पुढारी वृत्तसेवा: जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात (Ashadhi Wari 2023) सहभागी होण्यासाठी बलराज अश्वाचे आज (दि.९) श्री क्षेत्र देहूकडे रवाना झाला. सकाळी ११. ३० वाजता मोहिते- पाटील यांच्या धवलनगर येथील प्रतापगडावर बलराज अश्वाची विधीवत पूजा काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व उर्वशीराजे मोहिते पाटील या उभयतांच्या हस्ते झाली.

पंढरपूरच्या आषाढी वारीला (Ashadhi Wari 2023) जाण्यासाठी मोठ्या संख्येने लाखो भाविक श्री क्षेत्र देहूमध्ये दाखल होऊ लागले आहेत. उद्या शनिवारी (दि. १० जून) दुपारी दोनच्या सुमारास श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे मंदिरातून प्रस्थान होणार आहे. त्यासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. तर या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोहिते पाटील यांचा बलराज हा स्वाराचा अश्व मार्गस्थ झाला आहे.

यावेळी आण्णासाहेब इनामदार, माणिकराव मिसाळ, शिवाजीराव इंगवले देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश पालकर, नाना काळे, रणजित देशमुख, पोपट काळे, विकास शिंदे आदींसह भाविक उपस्थित होते.

Ashadhi Wari 2023 : बलराज अश्व आज सायंकाळी वाहनाने श्री क्षेत्र देहू येथे पोहोचेल.

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात अश्व देण्याची मोहिते- पाटील यांची परंपरा जुनी आहे. माजी मंत्री दिवंगत प्रतापसिंह मोहिते- पाटील यांच्याकडे देहू संस्थानने अश्वाची मागणी केली होती. तेंव्हापासून मोहिते- पाटील घराण्याचा अश्व पालखी सोहळ्यात सहभागी होतो, असे डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील यांनी सांगितले.

चार वर्षांचा बलराज हा अबलक अश्व उदयपूर राजघराण्यातील जयराज या अश्वाचा नर आहे. पालखी सोहळ्यात पाठविण्यापूर्वी त्याचा रोज सराव घेतला जात होतो. पालखी सोहळ्यात लाखो लोक अश्वाचे दर्शन घेतात. त्याच्या अंगाला स्पर्श करतात. यावेळी तो विचलित होवू नये, म्हणून त्याला खास प्रशिक्षण दिले जाते. त्याचा खुराक, पाणी व देखभाल करण्यासाठी शशिकांत बीटे व हसन शेख यांची नेमणूक केली आहे, असे डॉ. मोहिते- पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button