सोलापूर : आषाढीसाठी ५ हजार एसटी बस; सोलापूरातून २५० जादा गाड्या धावणार | पुढारी

सोलापूर : आषाढीसाठी ५ हजार एसटी बस; सोलापूरातून २५० जादा गाड्या धावणार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भरणाच्या यात्रेसाठी राज्य एसटी महामंडळाकडून विविध आगारातून ५ हजार बसेस नियोजन करण्यात आले आहे. यात सोलापूर विभागातील ९ डेपोतून २५० जादा गाड्या सोडण्याचे नियोजन एसटीने केले आहे. एकादशीसाठी पंढरपूरला जाणार्‍या भाविकांसाठी २५ जूनपासून रोज जादा गाड्या सोडल्या जात आहेत. ३ जुलैपर्यंत ही जादा वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव यांनी दिली.

महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक दरवर्षी आषाढी वारीमध्ये सहभागी होतात. यंदाही आषाढीवारीच्या निमित्ताने लाखो भाविक पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून जाणार्‍या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या भाविकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. २५ जुनपासून बसस्थानकांतून जादा एसटी गाड्या सोडल्या जात आहेत. शहरातील मुख्य बसस्थानकांतून जादा वाहतुकीची व्यवस्था केली आहे.

महिला, ज्येष्ठ नागरिकांची एसटीला पसंती

आषाढी वारीच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. पण रेल्वे प्रशासनाकडून ज्येष्ठ नागरिकांच्या तिकीट दरातील सुविधा बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यभरातून एसटीतून प्रवास करणार्‍या महिलांना तिकिटामध्ये ५० टक्के सवलत देऊ केली आहे. तसेच ७५ वर्षा पुढील ज्येष्ठ नागरिकांना एसटीने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच ६५ वर्ष पुढील नागरिकांना अर्धा तिकीट आकारले जाते. यामुळे वारीतील ज्येष्ठ नागरिक एसटीला प्रथम पसंती दर्शवताना दिसून येत आहे.

शहर बसेस

1) औरंगाबाद- १२५०
2) मुंबई- ५४०
3) नागपूर- ११०
4) पुणे- १२५०
5) नाशिक- ११००
6) अमरावती- ७५०

याठिकाणी असतील थांबे

1) चंद्रभागा बस स्थानक- पुणे, पंढरपुर, ठाणे, पालघर, रायगड, मुंबई, सांगली, रत्नागिरी, सातारा.
2) भिमा बस स्थानक- सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ.
3) विठ्ठल बस स्थानक- करमाळा, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक,
4) पांडुरंग बस स्थानक- सांगोला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली.

हेही वाचा : 

Back to top button