नंदुरबार : फेस ग्रामपंचायत : अतिक्रमण नडले; सरपंच-उपसरपंचासह तिघे अपात्र | पुढारी

नंदुरबार : फेस ग्रामपंचायत : अतिक्रमण नडले; सरपंच-उपसरपंचासह तिघे अपात्र

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

अतिक्रमित शेतजमीन बाळगल्याचे सिद्ध झाल्याने शहादा तालुक्यातील फेस ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच आणि एक सदस्य अशा तिघांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. या प्रकरणी नीलेश सागर अपर आयुक्त नाशिक विभाग यांनी आदेशित करत तिघे अपात्र असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.

राजश्री गणेश पाटील, लहू पुना भिल, पद्मा रगदेव भिल (रा. फेस, ता. शहादा, जि. नंदुरबार) अशी तिघांची नावे आहेत. यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी फेस शिवारातील सरकारी जमिनीवर अवैध व बेकायदेशीररीत्या तसेच पदाचा गैरवापर करून आर्थिक फायदा व्हावा म्हणून शेतजमीन अतिक्रमण करून याठिकाणी उत्पन्न घेतले जात आहे, असा किशोर पाटील यांनी आरोप केला. जमिनीच्या वापराबाबत ग्रामपंचायतीकडून कोणताही भाडेपट्टा करारनामा अथवा शासकीय जमीन वापराबाबतची परवानगी घेतलेली नाही. तसेच महसूल विभागाचीदेखील कोणतीही परवानगी न घेता सरकारी जमीन वापरत असल्याबाबत कोणताही महसूल भरणादेखील भरलेला नाही, असेही तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे विवाद अर्ज दाखल केला. त्यावर अपर आयुक्त, नाशिक विभाग यांच्यासमोर 5 जून 2023 रोजी कामकाज चालले. सर्वोच्च न्यायालय यांनी या प्रकरणात एखाद्या ग्रामपंचायत सदस्याने अगर त्या सदस्याचे कुटुंबातील सदस्यांनी सरकारी जागेवर निवडून येण्याच्या पूर्वीच्या काळात अतिक्रमण करून कब्जा केलेला असेल आणि अतिक्रमणधारक सदस्य व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी निवडणुकीपर्यंत व निवडणुकीच्यानंतरसुद्धा अतिक्रमित क्षेत्र कब्जात कायम ठेवल्याने येथील अतिक्रमणाच्या कारणामुळे सदस्यांना अपात्र ठरवण्यात आल्याचा निकाल असतानाही फेस ग्रामपंचायतच्या अतिक्रमण विषयक प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कानाडोळा केला जात होता. हे सर्व युक्तिवाद लक्षात घेऊन अप्पर आयुक्त यांनी तिघांना अपात्र घोषित केले आहे.

हेही वाचा:

Back to top button