आळंदीत सिद्धबेटातील संरक्षक भिंतीला भगदाड | पुढारी

आळंदीत सिद्धबेटातील संरक्षक भिंतीला भगदाड

आळंदी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आळंदी येथील सिद्धबेट या ठिकाणी पूर्वी संरक्षक भिंतीला समाजकंटकांनी भगदाडे पाडली होती, ती बुजवण्यात येणार होती. त्यादृष्टीने सिद्धबेट पर्णकुटीजवळील काही अंतरावरील संरक्षक भिंतीचे एक भगदाड सिमेंट काँक्रीट, वीट बांधकामाने बुजवले होते. मात्र, समाजकंटकांनी तेथे पुन्हा भगदाड पाडले आहे.

सिद्धबेट येथे सद्य:स्थितीत एक बाजू वगळता चालण्याकरिता दगडी ट्रॅक आहे. पावसाळ्यात या एका बाजूने दर वर्षी चिखल होऊन चालण्यास अडचण होते. ही बाब लक्षात घेऊन नगर परिषदेच्या पुढाकारातून आयएएचव्ही या संस्थेने त्यांच्या सीएसआर निधीतून दगडी वॉकिंग ट्रॅकसाठी मदत करण्यास सहमती दर्शवली. इतर विकासकामे करण्याचीही सहमती दर्शवली आहे. त्या विकासकामाचे भूमिपूजन दि.29 मे रोजी झाले होते. तसेच आयएएचव्ही या संस्थेकडून सद्य:स्थितीत तेथील प्रवेशद्वार, संरक्षक भिंती, रंगरंगोटी व सुशोभीकरणाचे काम चालू आहे. इतरही विकासकामे नगरपरिषदेच्या पुढाकारातून चालू आहेत.

संरक्षक भिंतींना जेथे मोठी भगदाडे समाजकंटकांनी पाडली आहेत, तेथे कचरा टाकणे व पेटवणे, वृक्षतोड, अवेळी येऊन मद्यपान आदी गैरवापरासाठी त्याचा वापर केला जातो. तसेच ठिकठिकाणी भगदाडे असल्याने गैरव्यक्ती येऊन गैरप्रकार करू शकतात. येथील क्षेत्र मोठे असल्याने प्रवेशद्वाराजवळील सुरक्षा रक्षक संरक्षक भिंतीला भगदाडे पाडलेल्या ठिकाणी गैरप्रकार घडला, तर तेथे लवकरात लवकर मदत पोहचू शकत नाही.

हे लक्षात घेता गैरप्रकारांना आळा बसणे व कुठलाही गैरप्रकार घडू नये, यासाठी ती भगदाडे बुजवणे गरजेचे होते. त्या दृष्टीने प्रथमतः तेथील बांधकाम केले होते. पाडलेल्या बांधकामाची संबंधित प्रशासनाने दखल घेऊन योग्य चौकशी व कारवाई होणे गरजेचे आहे, असा गैरप्रकार होऊ नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

Back to top button