Sulochana Latkar: सुलोचना दीदींना फाळके पुरस्कार मिळण्याची इच्छा अधुरीच! | पुढारी

Sulochana Latkar: सुलोचना दीदींना फाळके पुरस्कार मिळण्याची इच्छा अधुरीच!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके पुरस्कारांची यादी बघता आजवर कमी वयातील नवोदित कलाकारांना फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परंतु भारतीय चित्रपटसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांनी ४०० हून अधिक हिंदी-मराठी सिनेमे केले. कृष्णधवल काळापासून ते ८०च्या दशकापर्यंत त्यांनी काम केले. त्यांच्या कामगिरीचा उल्लेख केल्याशिवाय चित्रपटसृष्टी अधुरी आहे. पण दादासाहेब फाळके मानाचा पुरस्कार त्यांना मिळू शकला नसल्याची खंत व्यक्त करत केवळ ग्लॅमर असलेल्या कलाकारांना पुरस्कार दिला जातो का? असा प्रश्नही चित्रपट क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे. चित्रपट मंडळाच्या बऱ्याचशा कार्यक्रमांना सुलोचनादीदी आवर्जून हजर असायच्या. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या प्रकृती बरी नसतानाही तासन्तास कार्यक्रमाला बसून राहायच्या. ही खऱ्या कलाकाराची ओळख असते. वयाच्या ९४ व्या वर्षी सुलोचनादीदींचे निधन झाले. त्यांना पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, फिल्मफेअर, जीवनगाैरव, राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले पण अखेरपर्यंत त्यांना दादासाहेब फाळके मिळाला नाही.

स्वाक्षरी मोहीम

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके प्रतिष्ठेचा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांना मिळावा यासाठी ५ फेब्रुवारी २०१९ मध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक व नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट महाराष्ट्र यांच्या वतीने परशुराम साईखेडकर नाट्यमंदिरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती.

दादासाहेब फाळके पुरस्कार सुलोचनादीदींना फार आधीच द्यायला हवा होता. मुळात त्यांचा तो अधिकार होता. आता त्या पुरस्काराची गंमत गेली. पुरस्कारांची यादी बघितली तर नवोदित कलाकारांना पुरस्कार मिळाले पण दीदींना मिळाला नाही ही शोकांतिका आहे. – श्याम लोंढे, समितीप्रमुख, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ.

हेही वाचा:

Back to top button