Nitin Gadkari: लोकसभा निवडणूक आम्हीच जिंकू; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दावा | पुढारी

Nitin Gadkari: लोकसभा निवडणूक आम्हीच जिंकू; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दावा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: आगामी २०२४ ची सार्वत्रिक निवडणूक आम्हीच जिंकू. भविष्याची चिंता करणारे दु:खी होतात. त्यामुळे भविष्याची चिंता करू नका, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुन्हा भाजप सत्तेवर येईल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. एका वृत्तवाहिनीच्या वार्षिक कार्यक्रमानिमित्त आयोजित कान्क्लेव्ह मध्ये ते बोलत होते. यावेळी गडकरी म्हणाले, मी कुणाला मदत करीत नाही आणि विरोधही करीत नाही. मी केवळ देशासाठी काम करतो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘सबका साथ,सबका विकास’ या धोरणाला पुढे घेवून जात असल्याचेही गडकरींनी यावेळी स्पष्ट केले.

दिल्ली सरकारसोबत मतभेद असल्यासंबंधीच्या प्रश्नावर बोलतांना गडकरी म्हणाले, दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. दिल्लीतील वायु प्रदूषण संपवायचे आहे. वाहतूक कमी करायची आहे. आमचे राज्य सरकार सोबत कुठलेही मतभेद नाहीत, असेही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

चांगले काम करणाऱ्यांना सन्मान मिळाला पाहिजे. सामूहिक प्रयत्न करीत आम्ही सात जागतिक विश्वविक्रम केले आहेत. देशातील रस्ते अत्यंत चांगल्या पद्धतीने बनवले जात आहेत. हळूहळू ‘कार्यपद्धती’ बदलत आहे. ४० पैकी ४० अत्यंत महत्वाच्या योजनांवर काम सुरू आहे. इंधन म्हणून हायड्रोजनवर काम सुरू आहे. कचरा संपवायचा आहे, तसेच पर्यावरणाचे संरक्षण देखील करायचे आहे.

विरोधकांच्या राजकारणावर भाष्य करतांना ते म्हणाले, राजकारणाचा अर्थ लोकनीती, धर्म, समाजनीती आहे. लोकांना सत्तेच्या राजकारणात आवड नाही. काँग्रेसला सत्तेत अनेक वेळ मिळाला. त्यांच्यापेक्षाही कमी वेळेत मोदी सरकारने काम केले आहे. कृषी क्षेत्रात जोपर्यंत विकास होणार नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही, असे गडकरी म्हणाले.

हेही वाचा:

Back to top button