नागपूर कारागृहात जीवाला धोका; मला बेळगाव कारागृहात पाठवा: जयेश पुजारी | पुढारी

नागपूर कारागृहात जीवाला धोका; मला बेळगाव कारागृहात पाठवा: जयेश पुजारी

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन करुन १०० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा आरोपी जयेश उर्फ शाकीर पुजारीला नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान, माझी या प्रकरणी नागपुरातील चौकशी पूर्ण झाली आहे, त्यामुळे आपल्याला पुन्हा बेळगाव कारागृहात पाठविण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका जयेश पुजारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. पुजारीच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने कारागृह प्रशासन आणि पोलिस यांना नोटीसा बजावून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्नाटकमधील दोन खटल्याची सुनावणी आणि आपण गरीब असून पत्नी आणि दोन मुले तिकडे असल्याचे कारण त्याने यासाठी दिले आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा त्याने केला आहे. जयेश हा मागील दीड महिन्यांपासून नागपूर कारागृहात आहे. मुळात बेळगावात मिळणाऱ्या सुविधा त्याला नागपूर कारागृहात मिळत नसल्याने त्याने ही मागणी केली असावी, असा पोलिसांचा दावा आहे.

एनआयएने मागच्याच आठवड्यात जयेश उर्फ शकिरची चौकशी केली. जयेश हा बेळगाव कारागृहात असलेल्या दहशतवादी संघटनांचे म्होरके अकबर पाशा, कॅप्टन नसीर आणि फहद कोया रशीद मालाबारी यांच्या संपर्कात होता. त्यांच्याच सांगण्यावरुनच नितीन गडकरी यांच्या कार्यालयात तो धमकीचे फोन करीत होता. त्याचे संबंध पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध युएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा 

Back to top button