भाजप खासदार असल्यामुळे बृजभूषण यांना पोक्सो कायदा लावला जात नाही; कपिल सिब्बल यांचा आरोप | पुढारी

भाजप खासदार असल्यामुळे बृजभूषण यांना पोक्सो कायदा लावला जात नाही; कपिल सिब्बल यांचा आरोप

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह सत्ताधारी भाजपचे खासदार असल्यामुळे त्यांना पोक्सो कायदा लावत अटक केली जात नसल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे खासदार कपिल सिब्बल यांनी केला आहे. अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारासाठी पोक्सो कायद्यानुसार कारवाई केली जाते. अशा प्रकरणात गुन्हा दाखल झाला की लगेच आरोपीला अटक केली जाते.

सिंह यांच्यावर लैंगिक छळवणुकीचा आरोप करीत कुस्तीपटूंनी मागील काही दिवसांपासून आंदोलन चालविलेले आहे. जंतर मंतरवर चाललेले कुस्तीपटूंचे आंदोलन अलीकडेच दिल्ली पोलिसांनी उधळून लावले होते. कुस्तीपटूंनी आपली सारी पदके गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मंगळवारी ते हरिद्वारला पदके घेऊन पोहोचले होते. तथापि शेतकरी नेत्यांनी समजूत काढल्यानंतर कुस्तीपटू पदके विसर्जित न करता माघारी फिरले होते.

बृजभूषण सिंह यांच्या विरोधात छळवणुकीच्या अनुषंगाने 164 निवेदने सादर झालेली आहेत. शिवाय त्यांच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. असे असूनही त्यांना अटक होत नाही, हे दुर्दैवी आहे. ते भाजपचे खासदार असल्यामुळे, महिला कुस्तीपटूंना किंमत नसल्यामुळे किंवा मते जास्त महत्वाची असल्यामुळे अथवा सरकारला फिकीर नसल्याने सिंह यांना अटक केली जात नसावी, हे वास्तव असावे. हा आपला नवीन भारत आहे, असा टोलाही सिब्बल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लगावला आहे.

Back to top button