गोकुळच्या स्वीकृत संचालक पदी आर.के. मोरे यांची निवड निश्चित! २ जूनच्या सभेत होणार शिक्कामोर्तब | पुढारी

गोकुळच्या स्वीकृत संचालक पदी आर.के. मोरे यांची निवड निश्चित! २ जूनच्या सभेत होणार शिक्कामोर्तब

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : अरुण डोंगळे यांची गोकुळच्या चेअरमन पदी निवड झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची पहिलीच सभा शुक्रवार २ जून रोजी होत आहे. या सभेत स्वर्गीय विजयसिंह मोरे यांचे बंधू राजेंद्र कृष्णाजी उर्फ आर.के.मोरे यांची स्वीकृत संचालक पदी निवड करण्याचे निश्चित झाले आहे.

स्वर्गीय विजयसिंह मोरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या स्वीकृत संचालक पदी ही निवड होणार आहे. मोरे हे गोकुळचे नेते आ. सतेज पाटील यांचे समर्थक आहेत. विजयसिंह मोरे यांची स्वीकृत संचालक पदी निवड झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच त्यांचे निधन झाले होते. मोरे कुटुंबीय आणि मोरे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी स्वर्गीय मोरे यांचे राजकीय वारस म्हणून राजेंद्र मोरे यांची निवड केली होती. त्यानंतर गोकुळच्या स्वीकृत संचालक पदासाठी आ. सतेज पाटील यांच्याकडे एकमताने त्यांच्या नावाची शिफारस ही केली होती. आ. पाटील यांनीही मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

…असाही योगायोग

म्हणजे आर.के.मोरे यांच्या निवडीमुळे राधानगरी तालुक्यातील युवक काँग्रेसचे काम केलेला चौथा कार्यकर्ता एकाचवेळी गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळात जाणार आहे. चेअरमन अरुण डोंगळे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असताना गोकुळचे विद्यमान संचालक प्रा. किसनराव चौगले आणि आर.के.मोरे हे त्यांच्या कार्यकारणीत उपाध्यक्ष होते. नंतर आर.के.मोरेही तालुकाध्यक्ष झाले. तर गोकुळचे आणखी एक विद्यमान संचालक अभिजीत तायशेटे हेही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होते. गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळात हे चौघेही तत्कालीन युवक नेते एकाच वेळी कार्यरत असणे हा अनोखा योगायोग ठरत आहे.

हेही वाचा : 

Back to top button