नाशिक मनपाकडून १२५ दुकानदारांना नोटिसा; २४ तासांचा अल्टिमेटम | पुढारी

नाशिक मनपाकडून १२५ दुकानदारांना नोटिसा; २४ तासांचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहराची मुख्य बाजारपेठ अन् वर्दळीचे ठिकाण असलेल्या एमजीरोड, शिवाजी रोड, मेनरोड तसेच दहीपूल भागांतील तब्बल १२५ दुकानदारांना त्यांच्या आस्थापनांसमोरील अतिक्रमणे २४ तासांत काढावीत, अशा आशयाच्या नोटिसा महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयाच्या जाहिरात व परवाने विभागाने बजावल्या आहेत. अतिक्रमणे न काढल्यास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही नोटिसींच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरभर धडक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जात आहे. विशेषत: मुख्य बाजारपेठ असलेल्या एमजी रोड, शिवाजी रोड, मेनरोड, दहीपूल या भागांत अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. या भागातील बहुतांश विक्रेत्यांनी आपल्या आस्थापनांसमोर अनधिकृतपणे जाळी टाकणे, ओटे बांधणे, माल विक्रीसाठी ठेवणे तसेच जाहिरातींचे फलक लावण्याचे प्रकार केले आहेत. त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. वाहने उभी करणे तर सोडाच पायी चालणेदेखील अवघड होत असल्याने, अतिक्रमण तत्काळ हटविण्याचे नोटिसांद्वारे बजावण्यात आले आहे. पुढील २४ तासांच्या आत अतिक्रमण न हटविल्यास साहित्य जप्त करण्याबरोबरच जवळच्या पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून नोटिसा प्राप्त होताच, विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

पोटभाडेकरूंसाठी अतिक्रमण

मेनरोड, दहीपूल, शिवाजी रोड, एमजी रोड या भागांतील बहुतांश विक्रेत्यांनी आपल्या आस्थापनांसमोर अनधिकृतपणे ओटे बांधून छोट्या विक्रेत्यांना ती जागा भाड्याने दिली आहे. दिवसागाठी एक हजार ते दीड हजार इतके भाडे आकारले जात असल्याची बाब समोर येत आहे. याच कारणातून दहीपुलावर हप्तेवसुलीमुळे तोडफोड झाली होती. भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे पोलिस खात्याचेही वाभाडे निघाले होते. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी अतिक्रमणे वाढल्याचे दिसत आहे. सराफ बाजारातही असेच प्रकार करण्यात आले असून, पोटभाडेकरूंचा हा प्रकार वाढतच असल्याने, आता महापालिकेकडून हे ओटे तत्काळ हटविण्याचे विक्रेत्यांना बजावले आहे.

हेही वाचा:

Back to top button