कोल्हापूर: कळे येथे शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला आग | पुढारी

कोल्हापूर: कळे येथे शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला आग

कळे: पुढारी वृत्तसेवा: कळे (ता. पन्हाळा) येथे उच्च दाबाची विद्युतवाहिनी तुटून शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आनंदा गोविंदा सुर्यवंशी यांच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली. या दुर्घटनेत धान्य व वैरणीसह इतर साहित्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी (ता.२५) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अधिक माहिती अशी, कळे येथील तुकाई गल्लीच्या पाठीमागच्या बाजूला तळभैरी परिसरात आनंदा सुर्यवंशी यांचा जनावरांचा गोठा आहे. याठिकाणी त्यांनी जनावरे, धान्य व जनावरांसाठी लागणाऱ्या सुक्या गवताचा साठा करुन ठेवला होता. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास येथून गेलेल्या उच्च दाबाची विद्युतवाहिनी तुटल्यामुळे शॉर्ट सर्किट होवून गोठ्यास आग लागली. आनंदा सुर्यवंशी यांनी आरडाओरडा करून नातेवाईक व ग्रामस्थांना बोलावले. तातडीने गोठ्यातील तीन म्हैशी व एका गाईला बाहेर काढल्याने जीवितहानी टळली. पण आगीच्या तीव्रतेमुळे धान्य, वैरण, पत्र्याचे शेड व इतर साहित्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. आज (दि. २६) तलाठी संदीप कांबळे व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला.

हेही वाचा 

Back to top button