नाशिक : सालगडी नसल्याने शेतकरी चिंतातूर; दीड लाख रुपयांचा भाव | पुढारी

नाशिक : सालगडी नसल्याने शेतकरी चिंतातूर; दीड लाख रुपयांचा भाव

नाशिक (कनाशी) : पुढारी वृत्तसेवा

शेतकऱ्यांचे नवीन वर्ष म्हणून ओळख असलेला गुढीपाडवा सण पार पडला. खरिपाच्या हंगामाला सुरुवातही झाली. तरी ग्रामीण भागात सालगडी मिळेनासा झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी शेतकरी गुढीपाडवा सणाला शेतातील कामांसाठी सालगड्यांची नेमणूक करतात. परंतु यंदा शेतीत वर्षभर राबणाऱ्या सालगड्यांचे भाव दीड लाखाहून अधिक झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

ग्रामीण भागात शेतकरी गुढीपाडव्याच्या सणानंतर सालगड्याची शोधाशोध करत असतात. परंतु गुढीपाडवा होऊन खरिपाच्या हंगामातील मशागतीलाही सुरुवात झाली. शेतमजुरांचा अभाव आणि वाढत्या महागाईमुळे सालगडी शोधूनही मिळत नसल्याचे वास्तव आहे. काही ठिकाणी सालगडी मिळाले तर दीड लाख रुपयांच्याही पुढे सरकले आहेत. एक-दोन वर्षांपूर्वी सालगड्याचा करार एक लाख रुपयापर्यंत झालेला असायचा परंतु वाढत्या महागाईमुळे यंदा तो दीड लाखाच्या पुढे गेलेला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे. वाढती महागाई पाहता सालगडी व मजूरही शेतकऱ्यांना आम्हाला कमी पैशांत वर्षभर घरसंसार काटकसरीतून चालवावा लागतो, अशी सांगत असल्याचे बोलले जात आहे. अवकाळी पाऊस, पिकांना कवडीमोल भाव, चढत्या दराने सालगड्यांचे करार, मजुरांचा अभाव यामुळे शेतकरी हताश झालेला आहे. शेतीकामासाठी सालगडी मिळत नसल्याने मजबुरीने बैलजोडी विकून ट्रॅक्टरने मशागतीची पेरणी करून यांत्रिकीकरणाच्या शेतीकडे वळत आहे.

हेही वाचा:

Back to top button