पिंपळनेर -साक्री रस्त्यावर कांदा उत्पादकांचा दोन तास रास्ता रोको | पुढारी

पिंपळनेर -साक्री रस्त्यावर कांदा उत्पादकांचा दोन तास रास्ता रोको

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
कांदा व्यापाऱ्यांनी कांद्याला कमी भाव दिल्यामुळे, शेतकऱ्यांनी सामोडे म्हसदी फाटा येथे रस्ता रोको केला. त्यानंतर अपर तहसीलदार रवींद्र शेळके व सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर कांद्याचा पुन्हा लिलाव सुरू झाला व कांद्याला काही अंशी चांगला भाव मिळाला.

पिंपळनेर उपबाजार समितीचा कांदा लिलाव हा जागेअभावी सामोडे म्हसदी फाटा येथे लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार गुरुवार (दि.25) व्यापाऱ्यांनी कांद्याचा लिलाव बोली २०० पासून ते ३५० पर्यंत केली. त्यापैकी काही वाहनांचा लिलाव झाला असला तरी अल्प किमतीत भाव असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पिंपळनेर साक्री रोडवर रस्ता रोको केला. संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याला वाढीव भावाची मागणी केली असता भाव वाढवून मिळत नसल्याने, शेतकऱ्यांनी संघटित होऊन संतप्त रस्ता रोको केला. कांदा भरलेले वाहन रस्त्याच्या दोहो बाजूने आडवे करण्यात आले. यावेळी रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. अपर तहसीलदार व पोलिसांच्या मध्यस्थीनंतर पुन्हा लिलाव घेण्यात आला. दिवसभरात अंदाजे ४०० ते ४५० वाहनांचा लिलाव करण्यात आला. सर्व कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी केला.

यावेळी पंचक्रोशीतून आलेल्या शेतकऱ्यांनी कांद्याला भाव वाढ मिळाली पाहिजेत अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांकडे कांदा असून भाव नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याची चर्चा यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. केंद्र सरकार व राज्य सरकार यांचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे अशी आशा बोलून दाखवली. अपर तहसीलदार रवींद्र शेळके व सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी मध्यस्थी केली. त्यांच्यासह अपर तहसीलदार रवींद्र शेळके यांनी रस्ता रोको करत शेतक-यांशी चर्चा  केली. कांद्याचा पुन्हा लिलाव घेऊन योग्य भाव द्यावा असा तोडगा यावेळी निघाला. त्यानंतर काही अंशी भाववाढ मिळाल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना माल विकण्यास पसंती दिली.

हेही वाचा:

Back to top button