संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना पुन्हा इशारा; योग्य निर्णय न घेतल्यास… | पुढारी

संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना पुन्हा इशारा; योग्य निर्णय न घेतल्यास...

पुढारी ऑनलाईन डेस्क : “विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर वकील असतील तर त्यांनी न्यायालयाचा निकाल वाचावा. वेळकाढू धोरण फार काळ चालणार नाही. त्यांनी योग्य निर्णय न घेतल्यास जनता त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. नार्वेकरांना लवकर निर्णय घ्यावा लागेल,” असा पुन्हा इशारा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे.

“पक्षांतर करणं हा राहुल नार्वेकरांचा छंद आहे. तर पक्षांतराला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय आहे. नार्वेकरांना लोकशाहीची जाण नाही. त्यांनी वेळेत योग्य निकाल नाही दिला तर महाराष्ट्र काय आहे ते दाखवू. त्यांना लवकर निर्णय घ्यावाच लागेल. भाजपने महाराष्ट्र लुटला आहे. महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या फाईल्स तयार करत असून अनेकांच्या फाईल्स ईडीकडे पाठवल्या आहेत. गृहमंत्री कारवाई कधी करणार याचीच आता वाट पाहतोय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना निवडणूक घेऊ नका यासाठी दिल्लीतून त्यावेळी निरोप होते. नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ दिली नाही, असा आरोप राऊत यांनी केला आहे. तसेच कर्नाटक निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव भाजपमुळेच झाला असून सीमाभागासाठी आम्ही लढलो, आम्ही लढवय्ये आहोत, असेही राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आज दुपारी साडेचार वाजता महाविकास आघाडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित राहणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button